• Thu. Mar 12th, 2026
    एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा! वाढीव वेतनाचा थकीत हप्ता लवकरच मिळणार; 100 कोटींचा निधी मंजूर

    ST Bus Employee Salary: एसटी कर्मचाऱ्यांना थकीत वेतन मिळणार असून, राज्य सरकारकडून महामंडळाला 100 कोटींचा निधी उपलब्ध केला आहे.

    एसटी बस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा थकीत वेतन मिळण्याचा मार्ग आता खुला झाला आहे. एसटी महामंडळाने राज्य सरकारकडे ३२५ कोटींची मागणी केली होती. त्यापैकी १०० कोटींचा निधी राज्य सरकारने शासन निर्णयातून उपलब्ध केला आहे. यामुळे राज्यातील ८६ हजार कर्मचाऱ्यांच्या बॅंक खात्यात थकीत वेतन वाढीचे हप्ते जमा होणार आहेत.

    एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतन वाढीबाबत एसटी कामगार संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावर तोडगा काढत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली. थकीत वेतनवाढ समान टप्प्यात विभागणी करून त्याचा खर्च राज्य सरकारकडून करण्याचे आश्वासन बैठकीत देण्यात आले.

    Maharashtra TimesMumbai Weather: मुंबईत पाऱ्याची छत्तीशी! ‘संडे’ ही तापदायक, 24 फेब्रुवारीनंतर तापमान कमी होण्याचा अंदाज
    डिसेंबर महिन्याच्या वेतनासोबत थकीत वेतनाचे हप्ते देण्यात आले. मात्र फेब्रुवारी महिन्याच्या पगारात थकीत हप्ता देण्यात आला नव्हता. त्यामुळे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी थकीत हप्त्याचा निधी महामंडळाकडे वळता करण्याची विनंती सरकारला केली. त्यानुसार अर्थ विभागाने १०० कोटींचा निधी महामंडळाला दिला आहे. उर्वरित निधी लवकरच प्राप्त होण्याचे आश्वासन मंत्री सरनाईक यांनी दिले आहे.

    Maharashtra TimesAaditya Thackeray: राज्यसभेची ती एक जागा कुणाची? आदित्य ठाकरेंचं स्पष्ट मत, शरद पवारांचं नाव घेत म्हणाले…
    सरकारने शासन निर्णय जाहीर केला आहे. निधी प्राप्त झाल्यावर सोमवारपर्यंत वाढीव वेतनाची थकबाकी कर्मचाऱ्यांच्या खात्यात वळते करण्यात येणार आहे, असे महामंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान थकीत वेतनासाठी आंदोलन पुकारलेल्या एसटीतील कामगार संघटनांनी आंदोलन स्थगित करावे, असे आवाहन महामंडळाने केले आहे.

    व्यवस्थापक-कर्मचारी वाद चिघळला
    कल्याण एसटी आगाराचे व्यवस्थापक आणि कर्मचारी यांच्यातील वाद विकोपाला गेले आहेत. आगार व्यवस्थापकांकडून दिल्या जाणाऱ्या त्रासाबद्दल कर्मचाऱ्यांनी नागपूर अधिवेशनात तक्रार केली असून बदलीनंतरही ते पदभार सोडण्यास तयार नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. तर, भोये यांनी कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जात असून स्वतःच्या चुका लपविण्यासाठी कर्मचारी आपल्यावर आरोप करत असल्याचा प्रत्यारोप केला आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा