• Sat. Jun 6th, 2026
    Pune Crime: खाऊच्या बहाण्याने अपहरण, नराधमाकडून 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, पुणे स्टेशनवरील प्रकार

    Pune Crime: मुलगी कोठेही सापडली नव्हती, त्यामुळे घाबरलेल्या पालकांनी तातडीने पुणे लोहमार्ग पोलिस ठाणे गाठून आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.

    चिमुकलीवर लैंगिक अत्याचार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म.टा.प्रतिनिधी, पुणे: गावी जाण्यासाठी रेल्वेच्या प्रतीक्षेत पुणे रेल्वे स्थानकातील फलाटावर झोपलेल्या कामगार कुटुंबातील चार वर्षांच्या चिमुकलीला नराधमाने खाऊचे आमिष दाखवून पळवून नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पुणे लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलाने सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून शोध मोहीम राबवून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आणि पीडित चिमुकलीची सुटका केली.

    आरोपी महेश यादव (वय २५) याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार बलात्कार, अपहरण आणि लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या (पोक्सो) कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ही घटना मंगळवारी मध्यरात्री दीडला पुणे रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक तीन येथे घडली.

    Maharashtra TimesPune Murder Case: पुणे जिल्ह्यात भररस्त्यात हत्याकांड! पिकअपने उडवलं, नंतर धारदार शस्त्रांनी घाव, दुहेरी खुनाचा बदला?
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मध्य प्रदेशातील बालाघाट येथील रहिवासी असून, पीडित मुलीच्या कुटुंबीयांशी त्याचा परिचय आहे. पीडित मुलीचे कुटुंबीय मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. ते मध्य प्रदेशातील खांडवा येथे जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आले होते. रात्री जेवून रेल्वेची वाट पाहत पीडितेचे कुटुंबीय फलाटावर झोपले. मध्यरात्री पीडितेचे वडील जागे झाले. त्यांना मुलगी दिसली नाही. त्यामुळे त्यांनी कुटुंबीयांसह रेल्वे स्थानकावर मुलीचा शोध घेतला.

    लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाने तातडीने स्थानकावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. त्यात एक व्यक्ती लहान मुलीचा हात धरून तिला फलाटाच्या शेवटी घेऊन जाताना दिसला. शोधमोहिमेत सकाळी सहाला पार्सल गेट येथून आरोपीला अटक करून पीडितेची सुटका करण्यात पोलिसांना यश आले. आरोपीने खाऊचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचे पीडितेने सांगितले. तिच्या कपड्यांवर रक्ताचे डाग असून, पोटात दुखत असल्याने उपचार व तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

    Maharashtra TimesPune News : मळणीयंत्रात केस अडकले, पुण्यात महिलेचा हृदयद्रावक अंत, वाढदिवशीच मृत्यूने गाठलं
    रेल्वे स्थानकावरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
    प्राथमिक तपासात आरोपीने पीडितेवर अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार, पीडितेच्या आईची तक्रार नोंदवून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे रेल्वे स्थानकासारख्या गजबजलेल्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे महिला व बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा