• Sat. Jun 6th, 2026
    Budget Session 2026: विधिमंडळ अधिवेशनात विरोधकांची कसोटी; सत्ताधाऱ्यांच्या कोंडीची ‘मविआ’लाही संधी, कोणते मुद्दे गाजणार?

    Maharashtra Budget Session 2026: मुख्यमंत्र्यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी फडणवीस यांनी वित्तमंत्री या नात्याने सन २०२३-२४ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला होता.

    विधिमंडळ अधिवेशन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    संजय व्हनमाने, मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीला मिळालेले यश, महापौर निवडणूक आणि राज्यसभेच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये पडलेली फूट, या पार्श्वभूमीवर उद्या, सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांची कसोटी लागणार आहे. मात्र, अजित पवारांच्या निधनाच्या दिवशीच राज्यातील अल्पसंख्याक संस्थांना प्रमाणपत्र वाटप, मुलुंडमधील मेट्रो दुर्घटना, मंत्र्यांच्या दालनाताच उघड झालेली लाचखोरी आदी मुद्द्यांवरून राज्य सरकारला घेरण्याची संधी विरोधकांना आहे.

    अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील दालनातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंत्र्यांशी संबंधित कर्मचाऱ्यांना अटक केल्याने विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे २८ जानेवारीला मंत्रालयासह सर्व शासकीय कार्यालये बंद ठेवण्याचा आदेश निघाला असताना त्याचदिवशी राज्यातील शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देणारी प्रमाणपत्रे जारी करण्यात आली. त्यामुळे अल्पसंख्याक विकास विभागातील हा गैरव्यवहार सध्या चर्चेत आहे.

    Maharashtra TimesMaharashtra Politics: पवार अन् ठाकरे, जुळेनात आकडे; काँग्रेसचा ठाम पवित्रा, मविआत मोठा पेच, बलिदान कोण देणार?
    अधिवेशनाच्या तोंडावर सरकारने मुस्लिम समाजाला जात प्रमाणपत्र आणि जातवैधता प्रमाणपत्र देण्याबाबतचा १२ वर्षापूर्वीचा शासकीय आदेश रद्द केला. त्यामुळे मुस्लिम समाजात रोष निर्माण झाला असून, या मुद्द्यांवरून विरोधी पक्ष सरकारला घेरण्याची शक्यता आहे. राज्यातील इतर कायदा आणि सुव्यवस्थेचे मुद्दे अधिवेशनात गाजण्याची चिन्हे आहेत.

    Maharashtra TimesMarathi Schools: मुंबईत मराठी शाळांची दैना! तब्बल 57 शाळा बंद पडण्याच्या वाटेवर, काय कारण?
    अर्थसंकल्प ६ मार्चला
    राज्याचा सन २०२६-२७ या वर्षाचा अर्थसंकल्प ६ मार्च रोजी दुपारी २ वाजता सादर होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत, तर वित्त राज्यमंत्री आशीष जयस्वाल हे विधान परिषदेत अर्थसंकल्प मांडतील.

    अजितदादांची उणीव
    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर प्रथमच विधिमंडळाचे अधिवेशन होत असून, गेली साडेतीन दशके विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या अजितदादांची उणीव या अधिवेशनात प्रकर्षाने भासणार आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होईल. प्रथेप्रमाणे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अभिभाषणाची प्रत पटलावर ठेवून पुरवणी मागण्या सादर केल्या जातात. मात्र, या वेळी अधिवेशनात राज्यपालांचे अभिभाषण झाल्यानंतर अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडला जाईल. या शोकप्रस्तावरील चर्चेत सर्वपक्षीय आमदार सहभागी होऊन अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देतील. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा परिचय सभागृहाला करून देतील. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणाची प्रत सभागृहाच्या पटलावर ठेवली जाईल. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस सन २०२५-२६ या वर्षाच्या पुरवणी मागण्या सादर करतील.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा