• Fri. Mar 6th, 2026

    मॅनेजमेंट ट्रेनी ते SVP; अमृता फडणवीस यांचा राजीनामा; ॲक्सिस बँकेचा निरोप घेताना गहिवरल्या

    मॅनेजमेंट ट्रेनी ते SVP; अमृता फडणवीस यांचा राजीनामा; ॲक्सिस बँकेचा निरोप घेताना गहिवरल्या

    Amruta Fadnavis: अमृता फडणवीस यांनी ॲक्सिस बँकेतून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहेत. २३ वर्षांपूर्वी त्यांनी बँकेतून करिअरला सुरुवात केली. अखेर आज त्यांनी त्यांचा प्रवास थांबवला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध गायिका अमृत फडणवीस यांनी ॲक्सिस बँकेतील पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या २३ वर्षांपासून त्या ॲक्सिस बँकेत कार्यरत होत्या. मॅनेजमेंट ट्रेनी पदापासून त्यांनी कामाला सुरुवात केली. सिनियर व्हाईस प्रेसिडंट पदावरुन त्या निवृत्त झाल्या आहेत. याबद्दलची माहिती फडणवीस यांनी इन्स्टाग्रामवरुन दिली आहे.

    २३ वर्षांच्या सेवेनंतर अखेर निवृत्त होत असल्याची माहिती अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर दिली आहे. ‘ॲक्सिस बँकेत २३ वर्षांपूर्वी तरुण वयात व्यवस्थापन विभागात ट्रेनी म्हणून रुजू झाले. आज सिनिअर व्हाईस प्रेसिडंट पदावर असताना बँकेतील प्रवास इथेच थांबवते. या कालावधीत ब्रांच ऑपरेशन्सपासून कॉर्पोरेट बँकिंग, ट्रेझरी ते कस्टमर रिलेशन्सपर्यंतचा अनुभव घेतला. ही संस्था माझ्यासाठी कुटुंब, शिक्षक आणि दुसरं घर होती,’ अशा भावना अमृता फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.

    ‘माझे सहकारी, माझं नेतृत्त्व, विशेषत: व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ चौधरी यांची मी आभारी आहे. आयुष्यातील हा टप्पा संपतोय. पण आयुष्यभर पुरणारी अनुभवांची शिदोरी आणि मैत्री घेऊन पुढे जातेय. धन्यवाद ॲक्सिस बँक’, अशा शब्दांत फडणवीस यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.नागपूरमधील डॉक्टर कुटुंबात ९ एप्रिल १९७९ मध्ये जन्मलेल्या अमृता फडणवीस गेल्या २३ वर्षांपासून ॲक्सिस बँकेत कार्यरत होत्या. गेल्या काही वर्षांपासून त्या गायन आणि सामाजिक क्षेत्रातही सक्रिय आहेत. त्यांनी फायनान्समध्ये एमबीए केलं आहे. त्या राज्य स्तरावर टेनिस खेळल्या आहेत. अंडर-१६ मध्ये त्यांनी आपल्या क्रीडा प्रतिभेची झलक दाखवली.

    अमृता यांचा विवाह डिसेंबर २००५ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याशी झाला. दोघांना एक कन्या आहे. अमृता फडणवीस सोशल मीडियावर बऱ्याच सक्रिय असतात. फेसबुकवर त्यांचे लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवर त्यांचे १६ लाखांहून जास्त फॉलोअर्स आहेत. एक्स आणि यूट्यूबवरील त्यांच्या फॉलोअर्सचा आकडाही बराच मोठा आहे.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकर“कुणाल किशोर गवाणकर, महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींच्या बातम्या आणि त्यांचे विविध पैलू उलगडणारं लिखाण करण्यात हातखंडा. ब्रेकिंग न्यूज सोबतच राजकीय घडामोडींमधील बारकावे टिपून इनसाईड माहितीच्या आधारे सखोल विश्लेषण करणारं लिखाण करण्यात निष्णात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील रंजक घटना आणि घडामोडींवर लिखाण.
    तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. त्याआधी लोकमत ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्ये काम. न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 वृत्तवाहिन्यांमध्ये कामाचा अनुभव. पत्रकारितेत 14 वर्षांपासून कार्यरत.”
    … आणखी वाचा