• Fri. Mar 6th, 2026

    Pune Crime: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; संभाव्य खुनाचा कट उधळला, सुपारी देण्यात आलेला ‘शार्प शुटर’ पिस्तुलासह अटकेत!

    Pune Crime: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; संभाव्य खुनाचा कट उधळला, सुपारी देण्यात आलेला ‘शार्प शुटर’ पिस्तुलासह अटकेत!

    Pune Police: आरोपीकडून एक गावठी पिस्तुल, मॅगझिन व दोन जिवंत काडतुसे असा सुमारे ३५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे संभाव्य हत्या टळल्याचे पोलिसांनी सांगितले.

    पुणे पोलिसांची मोठी कारवाई; संभाव्य खुनाचा कट उधळला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : सूड उगवण्याच्या उद्देशाने आखलेला संभाव्य खुनाचा कट पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने उधळून लावला आहे. ‘शार्प शुटर’ला सुपारी देऊन पिस्तुल उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर कारवाई करत एकाला अटक करण्यात आली असून इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    चेतन ऊर्फ बाळ्या सिद्धनाथ जाधव (वय २६, रा. दांडेकर पुल) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्यासह सिंधु ऊर्फ आक्का धोत्रे, सिन्नु झरेकर, पिंकी रेणुसे, गणेश रेणुसे, अमन झरेकर (सर्व रा. महालक्ष्मी बिल्डिंग, सिंहगड रोड, दत्तवाडी), सुमित माने (रा. हडपसर), निशांत राऊत (रा. अप्पर बिबवेवाडी) आणि बापू कांबळे (रा. अप्पर बिबवेवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२४ मध्ये संतोष ऊर्फ भावड्या साळुंखे याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यापैकी गणेश रेणुसे हा सध्या जामिनावर बाहेर आहे. संतोष साळुंखे हा सूड उगवण्यासाठी रेणुसेवर हल्ला करू शकतो, अशी भीती रेणुसेच्या नातेवाईकांना वाटत होती. त्यामुळे त्याला आधीच संपवण्याचा कट रचल्याचं तपासात समोर आलं आहे. त्यासाठी गावठी पिस्तुल खरेदी करून चेतन जाधव याच्याकडे देण्यात आल्याची कबुली त्याने चौकशीत दिली आहे. काम पूर्ण झाल्यानंतर ठरावीक रक्कम देण्याचे ठरले होते, अशीही माहिती समोर आली.

    पोलिसांची कारवाई
    गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे व त्यांच्या पथकाला बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार दांडेकर पुल परिसरात सापळा रचून मांगीरबाबा चौक येथे चेतन जाधव याला ताब्यात घेण्यात आले.

    दरम्यान, ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे व त्यांच्या पथकाने केली.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा