• Mon. Jun 15th, 2026

    Pune Bhigwan Kidnapping Case: मी मर्जीने पळून आले; भिगवणमधील मुलीचा व्हिडिओ समोर, पण त्यांनी तो व्हिडिओ…; गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप

    Pune Bhigwan Kidnapping Case: मी मर्जीने पळून आले; भिगवणमधील मुलीचा व्हिडिओ समोर, पण त्यांनी तो व्हिडिओ…; गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप

    पुणे: इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील कथितरीत्या अपहरण झालेल्या मुलीला परत आणावे, या मागणीसाठी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. त्यानंतर झालेल्या निषेध सभेला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिंदू जनआक्रोश मोर्चा या नावाने हा मोर्चा भिगवण बस स्थानकापासून ते भिगवण पोलिस ठाण्यापर्यंत काढण्यात आला. त्यानंतर बस स्थानक परिसरात निषेध सभा झाली. मात्र या अपहरण प्रकरणाला नुकतेच नाट्यमय वळण लागले. कारण अपहरण झाल्याचा दावा करण्यात येत असलेल्या तरुणीचा एक व्हिडिओ समोर आला असून मी माझ्या मर्जीने पळून आल्याचं या व्हिडिओत ती तरुणी म्हणत असल्याचं दिसत आहे. असं असलं तरी त्या तरुणीवर दबाव टाकून हा व्हिडिओ बनवण्यात आल्याचं सांगत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे.

    “मुलीचा जबरदस्तीने व्हिडिओ बनवून हा व्हिडिओ पोलीस आणि नातेवाईकांना पाठवला जात आहे. मी आता मुलीचा भाऊ, मुलीचे मामा, मुलीचे चुलते यांच्याशी चर्चा केलीय. मुलीला वडील नाहीत. तिचं लग्न ठरलं होतं. पुढील दोन-चार दिवसात तिचं लग्न होणार होतं. अशा स्थितीत तिचं जबरदस्तीने अपहरण केलं आहे. त्यामुळे आज मी भिगवणला आलोय. भिगवण पोलीस स्टेशनला मी भेट देणार आहे. या घटनेनं सर्व हिंदू समाज संतापलेला आहे. मुलीचा हा व्हिडिओ कुठून आला, असं मी पोलीस अधीक्षकांना विचारलं. त्यांनी सांगितलं की, आरोपींनी वेगळं अॅप वापरलं आहे, त्यामध्ये लोकेशन दिसत नाही. त्यांनी पोलिसांना व्हिडिओ पाठवलाय, नंतर कुटुंबाला व्हिडिओ पाठवणं, म्हणजे त्यांचं धाडस वाढलं आहे, त्याला वाचवण्याचा कोणीतरी प्रयत्न करतंय,” असा गंभीर आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

    गोपीचंद पडळकर यांनी आरोपींच्या कुटुंबीयांवरही गंभीर आरोप केले आहेत. “आरोपीचे चुलते इथले गुंड आहे. त्यांची प्रचंड दहशत आहे. त्याच्यावर अनेक गुन्हेही दाखल आहेत. मागे हिंदू मुलीच्या अपहरणातही त्याचा सहभाग होता. इथल्या हिंदू मंदिरावर ते कब्जा घेत आहेत, मंदिरातील मूर्त्यांची त्यांनी तोडफोड केलेली आहे. हे कसं काय होतंय? इतके दिवस पोलीस का गप्प आहेत. इतके गुन्हे असताना त्याच्यावर मकोका का लावलेला नाही, अशा सगळ्या मुद्द्यांवर मी पोलिसांशी चर्चा करणार आहे,” असं पडळकर म्हणाले.

    दरम्यान, स्वामी चिंचोलीचे माजी सरपंच अझहर शेख यांच्या मध्यस्थीने मुलीला पळून नेल्याचा आरोप आमदार पडळकर यांनी केला.

    संग्राम जगतापही आक्रमक

    ‘या प्रकरणी कोणी दबाव टाकतील. कोणतेही व्हिडिओ येतील त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. संबंधित मुलगी उद्या हजर न झाल्यास पुन्हा २० तारखेला आंदोलनाची दिशा ठरवून आंदोलन केले जाईल,’ असं राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप म्हणाले. या प्रकरणात पोलिस साथ देत नाहीत, असाही आरोप त्यांनी केला. यावेळी माऊली हळनवर, शिवधर्म प्रतिष्ठानचे दीपक काटे आदींची भाषणे झाली.

    तरुणीने व्हिडिओत नक्की काय म्हटलं?

    ‘जहीर शेख याच्याबरोबर आपण स्वखुशीने पळून आलो आहोत,’ असे ती तरुणी सांगत असल्याचे या व्हिडिओत दिसते. कोणीही डोळ्यांत मिरची पूड वगैरे फेकलेली नाही, असेही ती म्हणत असल्याचे व्हिडिओत पाहायला मिळाले.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed