• Fri. Mar 6th, 2026
    तिसऱ्या मुंबईची अर्थभरणी! MMRDAच्या अर्थसंकल्पात 4000 कोटींची तरतूद, कोणत्या प्रकल्पासाठी किती निधी?

    MMRDA Budget FY 2026-27: सन २०१७-१८नंतर प्रथमच १७ लाखांचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर करण्यास ‘एमएमआरडीए’ला यश आले आहे.

    तिसरी मुंबई प्रकल्प(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मुंबई, नवी मुंबईनंतर आता तिसऱ्या मुंबईसाठी चार हजार कोटींची तरतूद करत नव्या शहराची अर्थभरणी अर्थसंकल्पातून केली आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात ४८,०७२ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला सोमवारी मंजुरी देण्यात आली. त्यातील तब्बल ८७ टक्के निधी प्रकल्पांसाठी आहे. विशेष म्हणजे, सर्वसामान्यांकरिता कोंडीमुक्त प्रवासासाठी भुयारी रस्ते विकासासाठी साडेपाच हजार कोटींची तरतूद करून भविष्यातील प्रवासमार्ग अधोरेखित केला आहे.

    गेल्या तीन वर्षांतील अथक परिश्रम, वित्तीय शिस्त यामुळे सन २०२४-२५मध्ये ७,४६८ कोटींच्या तुटीचा अर्थसंकल्प यंदाच्या आर्थिक वर्षात वित्तीय शिलकीचा झाला आहे. दरम्यान, २०२५-२६च्या सुधारित अंदाजाच्या तुलनेत हा ५८.६ टक्के अधिक आहे.

    Maharashtra TimesKishori Pednekar : विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांना स्थायी समितीचं सदस्यत्व नाही, ठाकरे गटाचा अजब निर्णय, राजकीय वर्तुळात चर्चा
    शहरातील वाढत्या गर्दीवर दीर्घकालीन उपाय म्हणून नवे शहर विकसित करण्यात येत आहे. कर्नाळा – साई – चिरनेर परिसरात नव्याने शहरीकरणासाठी चार हजार कोटींसह, रायगड पेण विकास केंद्रासाठी ५०० कोटी आणि खारबाव बिझनेस पार्कसाठी १०० कोटींची तरतूद आहे. यांचा समावेश मुंबई ३.० मध्ये आहे.

    गेल्याच आठवड्यात तिसऱ्या मुंबईसाठी राज्य सरकारने भूसंपादन-भूवाटप धोरणाचा शासन निर्णय जाहीर केला आहे. महामुंबईत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांसाठी ४२,०२६.१४ कोटींची तरतूद अर्थसंकल्पात आहे. मेट्रो प्रकल्पांसाठी सर्वाधिक १३,८३८.८८ कोटींची तरतूद आहे. यात उपनगरांतील वडाळा – कासारवडवली, स्वामी समर्थ नगर – कांजुरमार्ग, ठाणे – भिवंडी – कल्याण आणि दहिसर – मिरा भाईंदर या मार्गिकांचा समावेश आहे. रस्ते व उड्डाणपूल प्रकल्पांसाठी १२,८१६.५३ कोटी देण्यात येणार आहेत.

    मुंबई एकात्मिक भुयारी रस्ते प्रकल्प अर्थात वांद्रे – वरळी सागरी सेतू ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल दोनसाठी २४ हजार कोटींची प्रशासकीय मान्यता आहे. यासाठी यंदा १,१८९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ठाणे – बोरिवली आणि ऑरेंज गेट – मरीन ड्राइव्ह यांसारख्या भूमिगत बोगदा प्रकल्पांसाठी एकूण ५,५४३.५१ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

    ‘एमएमआरडीए’ कर्जातून २३,७११ कोटींचा निधी उभारणार आहे. जमिनींच्या व्यावसायिक वापरातून सुमारे ११,१७७.९५ कोटींचे उत्पन्न आणि शहरी परिवहन निधीतून ६,३६८.४२ कोटी मिळवण्याची अपेक्षा ‘एमएमआरडीए’ने व्यक्त केली आहे…

    Maharashtra TimesSunetra Pawar : दादांच्या निधनादिवशीच मंत्रालयातून प्रमाणपत्रं, सुनेत्रा पवारांचे चौकशीचे आदेश; म्हणाल्या, अजित पवार यांनी…
    रस्ते, महामार्ग, द्रुतगती मार्ग
    मुख्य वाहतूक मार्गांची जोडणी आणि मल्टी-रिंग रोड नेटवर्क १२,८१६.५३
    अटल सेतू ते मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जोडणी – ६०३
    आनंद नगर ते साकेत उन्नत मार्ग – ८८०.१२
    ठाणे कोस्टल रोड (बाळकुम-गायमुख) १,०२५.७७
    फाउंटन हॉटेल ते भाईंदर उन्नत मार्ग – ७५
    कल्याण रिंग रोड – ६००
    वरळी-शिवडी उन्नत कॉरिडॉर -९३६.०७
    विस्तारित मुंबई शहरी पायाभूत सुविधा प्रकल्प – २,३६२.२०
    मुंबई-वाढवण द्रुतगती मार्ग कॉरिडॉर (उत्तन-विरार सी लिंक) – २,०००
    मुंबई ते समृद्धी द्रुतगती मार्ग : साकेत ते आमणे जोड रस्ता – ५००
    पूर्व मुक्तमार्ग विस्तार (छेडा नगर, घाटकोपर ते ठाणे) – १,१०६.७५
    कल्याण-मुरबाड ते बदलापूर रस्ता (वालधुनी नदीलगत उन्नत रस्ता) – २००
    गायमुख ते पायगाव खाडी पूल -६८२.१०
    कासारवडवली, ठाणे ते खारबाव खाडी पूल – ८४०.७१
    कोलशेत, ठाणे ते काल्हेर, भिवंडी खाडी पूल – १०५.५१
    राष्ट्रीय महामार्ग ४ ते काटई नाका उन्नत रस्ता – ९००
    (आकडे कोटी रुपयांत)

    एमएमआर एकात्मिक मेट्रो नेटवर्क
    मेट्रो २अ (डी. एन. नगर ते दहिसर) – ४५.१९
    मेट्रो २ब (डी. एन. नगर ते मंडाळे) – १,२२४.६०
    मेट्रो ४ (वडाळा कसारवडवली) – ३,६३०.७१
    मेट्रो ४अ (कसारवडवली गायमुख) – १७६.५४
    मेट्रो ५ (ठाणे भिवंडी कल्याण) – १,३०९.३०
    मेट्रो ५अ (विस्तार) (दुर्गाडी ते उल्हासनगर) – १८३.३५
    मेट्रो ६ (स्वामी समर्थ नगर -कांजुरमार्ग) – २,४०७.७८
    मेट्रो ७ (अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) – २४.०५
    मेट्रो ९ आणि ७ अ (दहिसर -मिरा-भाईंदर / अंधेरी सीएसएमटी विमानतळ) १,१५१.८७
    मेट्रो १० (गायमुख ते मिरा रोड) – १००
    मेट्रो १२ (कल्याण ते तळोजा ) -१,०५४.५४
    मेट्रो १३ (घोडबंदर ते विरार) -२००
    मेट्रो १४ (कांजुरमार्ग ते बदलापूर) – ५००
    मंडाळे मेट्रो भवन – ४०३.३१
    मालवणी, मालाड व मंडाळे येथील कर्मचारी निवास २४८.९१
    कल्याण शिळफाटा जंक्शन ते भिवंडी राजनोली चौक, उड्डाणपूल – १५०
    मेट्रो ७ उन्नत पादचारी पूल (एफओबी) – ८४.१
    (आकडे कोटी रुपयांत)

    Maharashtra TimesHarshwardhan Sapkal: खुशाल जीभ कापा, मी थांबणार नाही; टिपू सुलतानच्या मुद्यावरुन सपकाळ यांचे प्रतिआव्हान
    पायाभूत सुविधा
    भुयारी-उन्नत रस्त्यांसाठी —५,५४३.५१
    ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह कोस्टल रोड भुयारी मार्ग —१,२५०
    मुंबई इंटिग्रेटेड टनेल —१,१८९
    गायमुख ते फाउंटन हॉटेल भुयारी मार्ग —७५
    ठाणे ते बोरिवली चार पदरी भुयारी मार्ग —३,०२९.५१
    (आकडे कोटी रुपयांत)

    घरे आणि पुनर्वसन
    झोपडपट्टी पुनर्वसन आणि गृहनिर्माण —७३१.३३
    माता रमाबाई आंबेडकर नगर एसआरए —५५१
    पुनर्वसन व पुनर्स्थापना —१५०
    परवडणारी भाडेतत्त्वावरील घरे —३०.३३
    (आकडे कोटी रुपयांत)

    Maharashtra TimesNarhari Zirwal : नॉट रिचेबल मंत्री ‘देवगिरी’ बंगल्यावर दाखल, राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक
    यंदाचा शिलकीचा अर्थसंकल्प हा वित्तीय शिस्त, भांडवल उभारणी आणि पायाभूत सुविधा अंमलबजावणीचा परिणाम आहे. वाहतूक जोडणी विस्तारत असताना, मुंबई ३.०च्या माध्यमातून विकासाचे विकेंद्रीकरण करण्यात येत आहे. या अर्थसंकल्पामुळे आर्थिक ताणाच्या टप्प्यातून आर्थिक स्थैर्याकडे जात असताना विकासही होत आहे. -डॉ. संजय मुखर्जी, आयुक्त, एमएमआरडीए

    सन २०१७-१८नंतर प्रथमच सादर झालेला ‘एमएमआरडीए’चा शिलकीचा अर्थसंकल्प संस्थात्मक वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा आहे. या माध्यमातून जागतिक पातळीवरील गुंतवणूकदारांचा विश्वास आणि पायाभूत सुविधांवर आधारित दीर्घकालीन विकासदृष्टी प्रतिबिंबित होते. –मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    एमएमआरडीए’च्या अर्थसंकल्पातील बहुतांश खर्च हा रस्ते, मेट्रो, उड्डाणपूल, बोगदे, बाह्यमार्ग अशा विकासकामांवर होत आहे. महामुंबईतील वाहतूककोंडी आणि पाणी नियोजनावर विशेष भर असून, ‘एमएमआरडीए’ मुंबईच्या विकासाचे ग्रोथ इंजिन आहे. – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा