• Tue. Aug 11th, 2026

    Gadchiroli Student Death: धानोरा तालुक्यात सर्पदंशाच्या घटनेनंतर सहपालकमंत्री अॅड.आशिष जयस्वाल यांनी आश्रमशाळांसाठी नवीन प्रमाणित कार्यद्धती ‘एसओपी’निश्चित करण्यात येईल अशी घोषणा केली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म.टा. वृत्तसवेा ,गडचिरोली: प्राथमिक पाहणीत आश्रमशाळेच्या परिसरात जळाऊ लाकूड आणि इतर लाकडांचे ढिगारे ठेवलेले दिसून आले. विद्यार्थिनी झोपत असलेल्या हॉलच्या खिडकीलगत विटांचे ढिगारेही ठेवलेले असल्याचे आढळले. परिसरातील लाकूड व विटांच्या ढिगाऱ्यांमधून साप खिडकीवाटे वसतिगृहात शिरला आणि विद्यार्थिनींना दंश केला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

    आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा सर्वंकष आढावा घेतला जाणार

    धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील आदिवासी आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा सर्वंकष आढावा घेतला जाणार आहे. अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आश्रमशाळांसाठी नवीन प्रमाणित कार्यपद्धती अर्थात ‘एसओपी’ निश्चित करण्यात येईल, अशी घोषणा गडचिरोलीचे सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनी केली.

    मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना शासकीय मदत

    यासोबतच मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची शासकीय मदत देण्यात येणार आहे. यातील एक लाख रुपयांची तत्काळ मदत कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आली. मुख्यमंत्री सहायता निधीतून अतिरिक्त पाच लाख रुपयांची मदत मिळविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

    आश्रमशाळेला भेट देत घटनास्थळाची पाहणी केली

    अॅड. जयस्वाल यांनी सोमवारी सर्पदंशाने दगावलेल्या विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. आश्रमशाळेलाही भेट देत घटनास्थळाची पाहणी केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधून वसतिगृहातील सुविधा, जेवण आणि इतर अडचणींबाबत माहिती घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी जेवणासह विविध गैरसोयींबाबत तक्रारी मांडल्या. जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना आपला मोबाइल क्रमांक देत कोणतीही अडचण असल्यास थेट संपर्क साधण्याचे सांगितले.

    Maharashtra TimesMithilesh Desai : पंतप्रधानांच्या शेजारी उभा, कोकणातील ‘फणस किंग’च्या मोदींशी गप्पा, रेवती सुळेंच्या रिसेप्शनमध्ये मिथिलेश देसाईने लक्ष वेधलं

    आश्रमशाळा प्रशासनाची कानउघाडणी

    जयस्वाल यांनी परिसरातील लाकूड व विटांचे ढिगारे, तसेच अपुऱ्या सुरक्षितता उपाययोजनांबाबत आश्रमशाळा प्रशासनाची कानउघाडणी केली. कुटुंबीयांची भेट आणि घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर काही बाबींमध्ये अधिक सजगता आणि जबाबदारीने काम करण्याची गरज असल्याचे दिसून आल्याचे जयस्वाल यांनी सांगितले. काही स्तरांवरील त्रुटींचा आढावा घेतला जाईल. भविष्यात अशी घटना घडू नये, यासाठी आवश्यक ती सर्व दक्षता घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    प्रशासनाचे संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे आदेश

    यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त आयुषी सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक एम. रमेश यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.दरम्यान, प्रशासनाने संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या चौकशीत दोषी आढळलेल्यांवर कारवाई करण्यात येणार, असे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी स्पष्ट केले आहे.

    आझाद समाज पार्टी आक्रमक

    या घटनेनंतर आझाद समाज पार्टीने तीव्र संताप व्यक्त केला असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी आश्रमशाळेतील सुविधांच्या प्रश्नावर प्रशासनावर टीका केली. संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही केली.

    १४ ऑगस्टला निर्णायक बैठक

    आश्रमशाळांचे व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात गठित विविध समित्यांचे कामकाज अधिक प्रभावी करण्यासह शासन व्यवस्थेत आवश्यक बदल करण्याच्या दृष्टीने १४ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित यंत्रणांची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत विद्यार्थी सुरक्षा, आश्रमशाळा व्यवस्थापन, विविध समित्यांचे कामकाज, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि संबंधितांची जबाबदारी या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करून नवीन ‘एसओपी’ निश्चित करण्यात येणार आहे.

    Maharashtra TimesAjanta News: दुरंगी बाभळीने अजिंठा बहरला; फुलली दुर्मीळ फुल

    सर्पदंशाने पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

    बुलढाणा पॉलिटेक्निकसाठी प्रवेश मिळाल्यानंतर घरी परतलेल्या विद्यार्थ्याचा शेतातसर्पदंशझाल्याने मृत्यू झाला. संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा खुर्द येथे ८ ऑगस्टच्या दुपारी ही घटना घडली. अमित ज्ञानेश्वर येनकर (वय १७) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. माजी सरपंच ज्ञानेश्वर येनकर यांचा तो मुलगा होता. पातुर्डा खुर्द शेत शिवारात फवारणीसाठी टाकीत पाणी भरत असताना त्याला सर्पदंश झाला. ही बाब लक्षात आल्यानंतर वडिलांनी त्याला तातडीने शेगाव येथील रुग्णालयात नेले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

    टीम मटा ऑनलाइन

    लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.… आणखी वाचा