• Fri. Mar 6th, 2026
    अजित पवार गेले, पण तुमच्या पाठीशी कोणी नाही असं समजू नका; सुनेत्रा पवारांची भावनिक साद, दादांचं स्वप्न…

    Sunetra Pawar on Ajit Pawar : पुणे, बारामतीत कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठीतून गेल्या काही दिवसांत सुनेत्रा पवार यांचा अजित पवार यांच्यासारखाच काम करण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून आले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘अजितदादा दादाच होते. त्यांच्यासारखे काम आपल्याला करता येणार नसले, तरीही आपल्याला काम करायचे आहे. मी कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कम उभी आहे. आपल्याला अजितदादांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे,’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी विजयी उमेदवारांना भावनिक साद घातली.

    विजयी उमेदवारांच्या गाठीभेटी

    दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्याने राष्ट्रवादी परिवारासह संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची नुकतीच शपथ घेतली. त्यानंतर त्यांची पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी वर्णी लागली. दु:खाचा डोंगर कोसळला असताना सुनेत्रा पवार यांनी पक्ष, कार्यकर्त्यांसाठी एक पाऊल पुढे टाकून आता पक्षाची धुरा हातात घेतली आहे. अजित पवार यांच्यासारखेच धडाडीने काम करण्याची जिद्द ठेवून त्या पावले टाकू लागल्या आहेत. पुणे, बारामतीत कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठीतून गेल्या काही दिवसांत त्यांचा अजित पवार यांच्यासारखाच काम करण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून आले.सुनेत्रा पवार यांनी पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर या चार तालुक्यांतील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या विजयी उमेदवारांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी बारामतीत घेतल्या. त्या बैठकांमध्ये नवनियुक्त पदाधिकारी, विजयी उमेदवारांसह कार्यकर्त्यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ओळख करून घेतली. त्यांच्या भागातील समस्या जाणून घेतल्या.

    पुण्यासह बारामतीतील कार्यकर्त्यांच्या भेटीत आपण सोबत असल्याचा विश्वासही सुनेत्रा पवार यांनी दिला. ‘अजितदादांच्या जाण्याने राष्ट्रवादी परिवाराने आता आपल्या पाठीशी कोणी नाही असे समजू नये. दादा ज्या पद्धतीने काम करायचे तसेच काम आपल्याला करायचे आहे,’ अशा शब्दांत सुनेत्रा पवार यांनी उपस्थित राष्ट्रवादीच्या सर्व विजयी उमेदवारांसह पदाधिकाऱ्यांना विश्वास दिला. ‘दादा नसले, तरी मी तुमच्यासोबत आहे. तुम्ही काळजी करू नका. पक्षवाढीसाठी जेवढी मदत करता येईल तेवढी करायला तयार आहे. तुमच्यासाठी राज्य सरकारकडूनही मदत करायला तयार आहे,’ असेही सांगून त्यांनी उपस्थितांना आश्वस्त केले.

    ‘त्या मुलाखती नव्हत्या…’

    गेल्या दोन दिवसांमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांची ओळख करून घेण्यासाठी बैठका घेण्यात आल्या. त्या बैठका म्हणजे मुलाखती असल्याचा समज कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाला. मात्र, ही बैठक नवनियुक्त सदस्यांची ओळख करून घेण्यासाठीच होती, असे आता राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

    पार्थ पवार अॅक्शन मोडमध्ये

    दर शुक्रवारी दौरा केल्यानंतर अजित पवार शनिवारी, रविवारी बारामतीत असायचे. बारामतीतील विविध विकासकामांची अधिकारी, पदाधिकाऱ्यांसह जाऊन पाहणी करायचे. जे खटकले ते तोंडावर बोलून चूक सुधारायला सांगायचे. त्यांचे निधन होऊन दोन आठवडे उलटले. त्यानंतर त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनी त्यांच्या संकल्पनेतील बारामतीमधील कन्हेरी येथील वन उद्यानासह इतर विकासकामांची पाहणी केली. त्यामुळे अजित पवार यांच्यानंतर आता पार्थ पवार हे ‘ॲक्शन मोड’वर आल्याचे बोलले जात आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा