• Mon. Jun 15th, 2026
    Pandharpur Crime : आईसमोर लेकाचा जीव घेतला, नंतर आईलाही संपवलं; विठ्ठलाच्या पंढरीत झालेल्या ‘त्या’ घटनेचा सात महिन्यांनी धक्कादायक उलगडा

    Pandharpur Crime News : आषाढी वारी संपल्यावर तब्बल आठ महिन्यापूर्वी पंढरपूर शहरात मायलेकाची क्रूर हत्या झाली होती. या तपासासाठी अनेक आंदोलने झाली होती. आता अखेर या घटनेचा उलगडा झालाय.

    पंढरपूर आई मुलाची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अरुण बाबर, सोलापूर (पंढरपूर) : पंढरपूर शहरात लखन जगताप आणि त्याची आई सुरेखा जगताप या मायलेकाची क्रूर हत्या झाली होती. मात्र, या दुहेरी हत्येचं कोडेच उलगडत नव्हते. जवळपास सात महिने या हत्येचा तपास सुरू होता. अखेर पंढरपूर शहरात झालेल्या या दुहेरी हत्याकांडाचा तपास आयपीएस अधिकारी प्रशांत डगळे यांच्याकडे आला आणि एक महिन्यात आरोपी गजाआड झाले.

    आईसमोर लेकावर वार

    हत्या झाल्यानंतर कोणताही सीसीटीव्ही नाही. तपासाचे धागेदोरे सापडत नव्हते. अशा आव्हानात्मक परिस्थितीत पुन्हा तपासाला सुरुवात केली. तब्बल 1200 फोन कॉल्स आणि इंटरनेट रेकॉर्ड्स तपासून महिन्याच्या आत यातील आरोपी गजाआड केलं. पंढरपूर शहरातील लखन संजय जगताप हा तरुण आणि त्याची आई सुरेखा यांची अत्यंत निर्घृणपणे रात्री साडेनऊच्या दरम्यान भर वस्तीत आणि घरात घुसून हत्या करण्यात आली होती. आधी मुलावर 16 वार केले, नंतर हत्या पाहणाऱ्या आईलाही नऊ वार करून संपवले होते. अवघ्या 10 मिनिटात हे दुहेरी हत्याकांड करून आरोपी फरार झाले होते.
    Maharashtra TimesNashik Accident: नाशिकमध्ये मोठी दुर्घटना; भाजप खासदाराच्या धावत्या रेंज रोव्हर कारला आग, क्षणात झाला कोळसा, नेमकं काय घडलं?
    आयपीएस अधिकारी प्रशांत डगळे यांनी माहिती देताना या हत्येसाठी मारेकऱ्यांनी गवत कापायच्या मशीनचे पाती घेऊन एक खास हत्यार बनविण्याचं सांगितलं. पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी यातील एक आरोपी विशाल शिंदे नाईक याने स्वतःच 112ला फोन करून हत्येची माहिती दिली होती. त्यावरून तपासाचे धागेदोरे पुन्हा नव्याने जुळविण्यास सुरुवात झाली. हत्येनंतर आरोपीने घरातील 55 इंच टीव्ही आणि इतर साहित्य चंद्रभागा नदीत फेकून दिले आणि चोरीचा बनाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी सर्व तपास यंत्रणा वेगाने सुरू केली आणि चंद्रभागेत फेकून दिलेले टीव्हीचा संच आणि मारलेले हत्यार शोधून काढले.

    संपूर्ण हत्येचा उलगडा

    या हत्येमध्ये एक अल्पवयीन बालकाने आरोपींना मदत केल्याचं समोर आलं. हत्येच्यावेळी पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांच्या खबऱ्याने मित्र बनवून त्याच्याकडून माहिती काढून घेतली. त्यानंतर संपूर्ण हत्येचा उलगडा झाला. यातील आरोपी विशाल याने अथर्व शिंदे नाईक याच्या मदतीने हे दुहेरी हत्याकांड घडविले. आरोपी आणि मृत पावलेले जगताप कुटुंबीय शेजारी राहत होते. यातूनच निर्माण झालेले वैमानस्य हे मृत्यूचं कारण असल्याची शक्यता असल्याची माहिती प्रशांत डगळे यांनी दिली असली तरी यामागे काही अनैतिक संबंध आहेत का? याचाही तपास पोलीस करीत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
    Maharashtra TimesKolhapur Murder Case: मुलगा वडिलांच्या जीवावर उठला, तरुणाने माजी सैनिकाला निर्घृणपणे संपवलं; पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, पण बायकोने…
    आरोपी हत्येनंतर राजस्थानला कामासाठी गेल्याचं समोर आलं. हत्येच्यावेळी आरोपी विशाल याचा फोन एका तासासाठी बंद होता आणि फोन बंद करण्यापूर्वी त्याने दुसरा आरोपी अथर्व याच्याशी फोनवर बोलल्याचे पुरावे मिळाल्यावर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अधिक माहिती घेताना आरोपींनी घरातून नेलेल्या टीव्ही आणि हत्येसाठी वापरलेली हत्यार हे चंद्रभागेच्या पात्रात टाकल्याचं सांगितलं. पोलिसांनी चंद्रभागेतून 55 इंच टीव्ही आणि हत्यार ताब्यात घेतलं आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात उभं केलं असता न्यायालयाने त्यांना नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा