• Sat. Jun 13th, 2026
    Nashik Metro Project: नाशिकमध्ये धावणार नियमित मेट्रो; फेब्रुवारीअखेर सर्व यंत्रणांची बैठक, कोणत्या मार्गे धावणार?

    Nashik Metro Project: मेट्रो शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूकव्यवस्था बळकट व्हावी, या उद्देशाने केंद्र सरकारने सर्व महापालिकांना स्वतंत्रपणे वाहतूक आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

    नाशिक मेट्रो प्रकल्प(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: महामेट्रोकडून नाशिक शहरात करण्यात आलेल्या वाहतूक सर्वेक्षणात मेट्रोसाठी आवश्यक प्रतितास २० हजार प्रवासीसंख्येचा आकडा पार झाला आहे. त्यामुळे टायरबेस्ड मेट्रो निओऐवजी शहरासाठी नियमित मेट्रोचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र मेट्रोरेल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने मेट्रोसंदर्भात निर्णय घेण्यासाठी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात महापालिकेसह सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी संबंधित सर्व संस्थांची बैठक बोलविण्यात आली आहे. नाशिकमध्ये मेट्रो सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री कार्यालय सकारात्मक असल्याने नाशिककरांच्या मेट्रोबाबतच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

    महापालिकेचा पहिला सर्वंकष वाहतूक आराखडा २०१६ मध्ये तयार करण्यात आला. त्या वेळी २०३६ च्या लोकसंख्येचा विचार करून आराखड्याचे नियोजन करण्यात आले होते. सार्वजनिक परिवहन व्यवस्था सक्षमीकरणावर भर देण्याबरोबरच सार्वजनिक वाहतूक धोरण, पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक, रस्ता विकास, मालवाहतूक, तंत्रज्ञान व रहदारी अभियांत्रिकी धोरणाचा समावेश होता.

    Maharashtra Timesदुर्दैवी! विजेच्या धक्क्याने शेतकरी महिलेचा मृत्यू; पतीला वाचविताना ओढावलं संकट, नाशिक हळहळलं
    अर्बन मास ट्रान्झिट या दिल्लीस्थित (यूएमटीसी) कंपनीने सर्वंकष वाहतूक आराखडा तयार केला होता. त्यातूनच शहरात सिटीलिंक कंपनीची बससेवा सुरू झाली. त्या आराखड्याचाच आधार घेऊन पुढे नाशिकसाठी टायरबेस्ड मेट्रो निओची घोषणा करण्यात आली होती. त्यासाठी २१०० कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला होता. मात्र, मेट्रो निओऐवजी आता नियमित मेट्रोसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. रेल्वे कॉर्पोरेशनने त्या अनुषंगाने नाशिकचा वाहतूक आराखडा तयार केला असून, त्यात मेट्रोसाठीच्या निकषांची पूर्तता झाली आहे.

    अशी आहे मेट्रोसाठीची अट
    मेट्रोसाठी तासाला २० हजार प्रवासी मिळणे अपेक्षित आहे. मात्र, नाशिकमध्ये प्रतितास चौदा हजार प्रवासी मिळत असल्याने टायरबेस्ड मेट्रोचा पर्याय निवडण्यात आला. मात्र, मेट्रो निओला उशीर झाल्यानंतर आता नियमित मेट्रोसाठी पावले उचलण्यात आली आहेत. त्यासाठी महामेट्रोने नाशिकचा वाहतूक आराखडा तयार केला. कोलकातास्थित श्रेय कंपनीने तयार केलेल्या आराखड्यात नाशिकमध्ये प्रतितास २० हजार प्रवासी असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे हा आराखडा आता मुख्यमंत्री कार्यालयात सादर केला जाणार आहे.

    Maharashtra TimesNashik Accident: नाशिकमध्ये मोठी दुर्घटना; भाजप खासदाराच्या धावत्या रेंज रोव्हर कारला आग, क्षणात झाला कोळसा, नेमकं काय घडलं?
    अशी धावणार मेट्रो
    -नियमित (रुळावर धावणारी) मेट्रोसाठी पहिल्या टप्प्यात (३१.४० किलोमीटर) तीन मार्ग निश्चित
    पहिला मार्ग (१९ किलोमीटर) : सातपूर- श्रमिकनगर- अमृत गार्डन- त्र्यंबक रस्ता- मोडक चौक- खडकाळी सारडा चौक- द्वारका- पुणे महामार्ग- नाशिकरोड रेल्वे स्टेशन
    -दुसरा मार्ग (१० किलोमीटर) : मुंबई नाका अशोकस्तंभ-गंगापूर रोड- गंगापूर गाव
    -तिसरा मार्ग (२.२४ किलोमीटर): श्रमिकनगर- बारदान फाटा जोडून रिंग तयार करणे

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा