• Tue. Sep 22nd, 2026

Bageshwar Baba: बागेश्वर बाबा पुन्हा अडचणीत, ‘पुत्रयोगा’चा दावा खोटा ठरला? भक्ताला चौथ्यांदाही मुलगी, कुटुंबाची अंनिसकडे तक्रार

जितेंद्र खापरे, नागपूर : बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी कथितरीत्या केलेल्या ‘पुत्रयोगा’च्या दाव्यानंतर मुलगा होईल, अशी अपेक्षा असलेल्या भक्ताच्या घरी चौथ्यांदाही मुलगी झाल्याचा दावा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला आहे. या प्रकरणामुळे बागेश्वर धाममध्ये करण्यात येणाऱ्या कथित दाव्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. उत्तर प्रदेशातील संबंधित भक्ताने आपली आपबिती अंनिसचे हरीश देशमुख यांना फोनवरून सांगितल्याचा गावा देशमुख यांनी केला आहे.

हरीश देशमुख यांनी सांगितले की, राजेंद्र नावाचा हा व्यक्ती २०२४ पासून बागेश्वर धामच्या दरबारात जात होता. मे २०२४ मध्ये तो पत्नीसमवेत बागेश्वर धाम येथे गेला होता. त्यावेळी कथितरीत्या त्यांची ‘पार्ची’ काढण्यात आली. या चिठ्ठीत राजेंद्र यांच्या पत्नीला ‘प्रेतबाधा’ असून भूत-प्रेतांचा त्रास असल्याचे तसेच २०१९ मध्ये तिच्यावर जादूटोणा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. याच चिठ्ठीत पुढे ‘पुत्रयोग’ असल्याचा उल्लेख करण्यात आल्याचे संबंधित भक्ताने देशमुख यांना सांगितले.

या दाम्पत्याला यापूर्वी तीन मुली होत्या. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना सुरुवातीला मुलगा होण्याची अपेक्षा नव्हती. मात्र, बागेश्वर धाममध्ये ‘पुत्रयोग’ असल्याचे सांगण्यात आल्यानंतर त्यांनी पुन्हा अपत्यासाठी प्रयत्न केले. ११ जून २०२६ रोजी त्यांच्या चौथ्या अपत्याचा जन्म झाला. मात्र, नवजात अपत्य मुलगी असल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर संबंधित भक्त मुलीला घेऊन पुन्हा बागेश्वर धाम येथे गेला. तेथे त्याने कथितरीत्या धीरेंद्र शास्त्री यांच्यासमोर मुलीला ठेवले असता बाबांनी विचारले ‘काय आहे, लाला आहे की लाली आहे,’ तेव्हा त्या भक्तांनी म्हटले ‘तुम्ही मुलगा होईल असे सांगितले होते, मात्र मुलगी झाली,’ असा सवाल केला. त्यानंतर बाबा त्या भक्तावर भडकले आणि वाद झाल्याने त्याला मंडपातून बाहेर काढण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या घटनेनंतर संबंधित व्यक्तीने बागेश्वर धाममधील कथित दाव्यांबाबत नाराजी व्यक्त केली. ‘बाबा खोटे बोलतात, लोकांची दिशाभूल करतात,’ असे त्याचे मत झाल्याचे देशमुख यांनी सांगितले. त्यानंतर त्याने संपूर्ण प्रकाराची माहिती अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे दिली. अशा प्रकारचे दावे करणाऱ्या व्यक्तींकडे मोठ्या संख्येने लोक जात असल्याने या दाव्यांची वैज्ञानिक पद्धतीने पडताळणी होणे आवश्यक असल्याचे हरीश देशमुख यांनी म्हटले आहे. संबंधित भक्ताने बागेश्वर धाममध्ये जाण्यासाठी आणि कथित ‘पेशीं’साठी मोठा खर्च झाल्याचाही दावा केला आहे. सुरुवातीला ११०० रुपये भरल्यानंतर विविध भेटी आणि पेशींमध्ये मिळून सुमारे २५ हजार रुपये खर्च झाल्याचे त्याने सांगितल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. बागेश्वर धाममध्ये वारंवार पेशी करण्यास सांगितले जात असल्याचा आरोपही संबंधित व्यक्तीने केला आहे.

दरम्यान, या प्रकरणी संबंधित भक्त उत्तर प्रदेशात तक्रार करण्याच्या तयारीत आहे. तेथे तक्रार स्वीकारली गेली नाही, तर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचा विचार आहे. तसेच बागेश्वर धाम किंवा धीरेंद्र शास्त्री यांच्याकडून अशाच प्रकारे फसवणूक किंवा दिशाभूल झाल्याचा आरोप असलेल्या अन्य व्यक्तींनी समितीशी संपर्क साधावा. संबंधितांना सोबत घेऊन पोलिसांकडे तक्रार करण्यात येईल, असेही देशमुख यांनी सांगितले.

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed