• Thu. Mar 12th, 2026

    Satara ZP : साताऱ्याच्या राजकारणात ट्विस्ट, शंभुराज देसाई यांच्या विधानानंतर भाजप सत्तेचा प्रस्ताव घेऊन जाणार?

    Satara ZP : साताऱ्याच्या राजकारणात ट्विस्ट, शंभुराज देसाई यांच्या विधानानंतर भाजप सत्तेचा प्रस्ताव घेऊन जाणार?

    सातारा जिल्हा परिषदेच सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपला सोबत न घेता सत्ता स्थापनेच्या तयारीत असल्याची चर्चा असतानाच आता मंत्री शंभुराज देसाई यांच्या नव्या वक्तव्याने मोठा ट्विस्ट निर्माण केला आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची एकत्रित सत्ता सातारा जिल्हा परिषदेत स्थापन होईल का? ते पाहणं आता महत्त्वाचं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुधीर पाटील, सातारा : “ग्रामसविकास मंत्री जयकुमार गोरे हे निवडणुकीत जास्त बोलल्यामुळे दमले असतील. त्यामुळे निकालानंतर सत्ता स्थापनेबाबत काहीही बोलले नसावेत”, असा खोचक टोला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी लगावला आहे. तसेच जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आमच्याकडे दोन महिला उमेदवार असल्याचेही त्यांनी ठासून सांगितले. सातारा जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. सत्तेपासून भाजपला दूर ठेवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा प्रयत्न असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आम्ही पालकमंत्र्यांना मिठी मारायला तयार असल्याचे वक्तव्य केले होते. मात्र, सत्ता स्थापनेबाबत तोडगा निघालेला नाही.

    या घडामोडींनंतर शंभूराज देसाईंनी आज पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, जिल्ह्यात भाजपचे दोन मंत्री आहेत. पण त्यांच्याकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने सत्ता स्थापन करण्याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याचा खुलासाही केला.

    सातारा जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेचा गुंता कायम असून महायुतीतील तिन्ही घटक पक्ष एकमेकांच्या रणनीतीला समजून घेत आहेत. सत्ता स्थापनेबाबत भाजपकडून प्रस्ताव आल्याशिवाय त्यांच्याशी कोणती चर्चा होणार नाही, असे थेट स्पष्टीकरण साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत दिले. शिवसेना पक्षाने चांगले यश मिळवले आहे. विजयी सदस्यांच्या गट नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचीही गट नोंदणी प्रक्रिया सोमवारपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

    सत्ता स्थापने संदर्भातील प्रश्नावर बोलताना शंभूराज देसाई म्हणाले की, भाजप नेते जे बोलतात ते करत नाहीत. मिठी मारण्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र, ते फारसे गांभीर्याने नव्हते. सत्कार मेळाव्यामध्ये आम्ही आज आमच्या सदस्यांच्या भावना जाणून घेतल्या. त्याचा सविस्तर अहवाल सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देणार आहोत. सत्ता स्थापनेबाबत जो काही निर्णय होईल ते तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील.

    सातारा जिल्ह्यात भाजपकडून आम्हाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना एकत्र आहे. वरिष्ठांच्या सूचनेनुसार महायुतीतील तिन्ही पक्षांना एकत्र चर्चा करावी लागल्यास आम्ही समोरासमोर बसून चर्चा करू. भाजपशी चर्चा करताना मी आणि राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील आम्ही दोघे चर्चा करणार आहोत, असेही शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा