• Fri. Mar 6th, 2026
    मित्राची अनामिक ओढ, आईची नजर चुकवून नाशकातील तीन अल्पवयीन मैत्रिणी भेटीला, रात्री घराजवळ पेरुच्या बागेतच…

    Nashik Minor girls missing : अत्यंत सामसूम, निर्जन परिसर असलेल्या पेरूच्या बागेतील दाट झाडीत आणि रात्रीच्या किर्र अंधारात या तिघीही मैत्रिणी रात्रभर थांबून राहिल्या

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. वृत्तसेवा, नाशिक : मित्राच्या अनामिक ओढीने आईची नजर चुकवून तीन अल्पवयीन मैत्रिणी घरातून गेल्या खऱ्या. मात्र, घरी परतण्यास उशीर झाल्याने घरचे रागावतील या भीतीने त्यांनी घरी जाण्याचे टाळले आणि संपूर्ण रात्र तिघींनी पेरूच्या बागेत काढली. ही घटना आहे नाशिकमधील. विशेष म्हणजे अत्यंत सामसूम, निर्जन परिसर असलेल्या पेरूच्या बागेतील दाट झाडीत आणि रात्रीच्या किर्र अंधारात या तिघीही मैत्रिणी रात्रभर थांबून राहिल्याचे वास्तव त्यांच्याच तोंडून समजताच त्यांचा शोध घेणारे पोलिस पथक आणि त्यांचे कुटुंबीयही अवाक् झाले.

    नेमकं काय घडलं?

    घरचे रागावतील या भीतीने संपूर्ण रात्र घरापासून दूर दाट झाडीत आणि किर्र अंधारात घालविणाऱ्या या तिघी मैत्रिणींत दोन जणी सख्ख्या बहिणी आहेत. दोन्ही बहिणी दहावीतील आपल्या मैत्रिणीच्या घरी मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास अभ्यासासाठी गेल्या होत्या. घरासमोरील शेतात तिघी अभ्यास करीत असताना मैत्रिणीची आईदेखील त्यांच्याजवळच बसून तिचे काम करीत होती. आई पाण्याचा हंडा भरून घेऊन घरात गेल्याची संधी बघून तिघीही मैत्रिणींनी दुपारी साडेतीनला मित्राला भेटण्यासाठी धूम ठोकली. थोड्या वेळाने आई घराबाहेर आल्यावर तिघीही जागेवर नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. सायंकाळपर्यंत त्या परत न आल्याने त्यांनी शोध घेण्यास सुरुवात केली. मुलीच्या मैत्रिणींच्या घरी चौकशी केली. त्या तिथेही नव्हत्या. दिवसभर त्या कुठेच न आढळल्याने अखेर मुलीच्या कुटुंबीयांनी जवळचे पोलिस ठाणे गाठून तीन मुली बेपत्ता झाल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना दिली.
    Maharashtra TimesBengaluru Accident : स्कूल बसने वळणावर चिरडलं, कॉन्स्टेबलच्या डोळ्यादेखत दोन चिमुरडींचा अंत, अंगावर काटा आणणारं CCTV फूटेज

    पहाटेपर्यंत शोधमोहीम

    घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तिघीही मुलींच्या पालकांना सोबत घेऊन त्यांचा परिसरात शोध घेतला. त्या न आढळल्याने तिघींपैकी एकीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी पहाटे चारला अखेर तिन्ही मुली बेपत्ता झाल्याचा गुन्हा पोलिस ठाण्यात दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा मुलींचे सर्च ऑपरेशन सुरू केले. संपूर्ण रात्र पोलिसांनी हे सर्च ऑपरेशन सुरू ठेवले.

    Eknath Shinde | ड्रग्स फ्री आणि प्रदूषणमुक्त मुंबई करण्यासाठी प्रयत्न करणार, शिंदेंची घोषणा

    अखेरीस या तिन्ही मुली बुधवारी घाबरलेल्या स्थितीत आढळल्या. त्यांना ताब्यात घेऊन तिघींनाही पोलिस ठाण्यात त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले. या तिघी अल्पवयीन मुलींच्या शोधासाठी पोलिसांनी दहा तास सर्च ऑपरेशन राबवले.
    Maharashtra TimesCab Driver Obscene Message : भावा, शरीरसंबंध ठेवणार का? कॅब बूक करुन ग्राहकाचा चालकाला अश्लील मेसेज, नकार देताच चक्रावणारा प्रकार

    …म्हणून रात्रभर घराबाहेर

    घरी येण्यासाठी उशीर झाल्याने घरचे रागावतील या भीतीने आपण घरी न येता पेरूच्या बागेतच थांबून राहिल्याची माहिती तिन्ही मुलींनी पोलिसांना दिली. किर्र अंधारात मुलींनी रात्रभर ठिय्या दिल्याची बाब समजल्यावर सर्वांनाच आश्चर्य वाटले. आजूबाजूला कोणीही नसताना तिघींनी एकमेकींना धीर देत रात्र काढली.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा