रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली होती. पण निकालानंतर आता भाजपने स्वतंत्र गट स्थापन केला आहे. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेत सत्ता समीकरण बदलणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
भाजपच्या या निर्णयामुळे रायगड जिल्हा परिषदेत सत्ता समीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. निवडणुकीपूर्वी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती झाली होती. मात्र निवडणूक निकालानंतर दोन्ही पक्षांनी संयुक्त गट नोंदणी न करता स्वतंत्र गट नोंदणी करण्याची भूमिका घेतल्याने जिल्हा परिषद राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. भाजपचे 15 सदस्य विजयी झाले असून, पक्षाने दाखवलेली ही एकजूट भविष्यातील सत्ता स्थापनेसाठी महत्त्वाची मानली जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे १६ सदस्य निवडून आले असले तरी त्यांनी अद्याप अधिकृत गट नोंदणी केलेली नसल्याची माहिती समोर येत आहे. तसेच शिवसेना (शिंदे गट) यांनीही गट नोंदणी न केल्यामुळे राजकीय चित्र अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. सत्तेत सहभागी होण्यासाठी शिवसेना (शिंदे गट) भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव टाकत असल्याचे संकेत मिळत असून, यामुळे जिल्हा परिषद सत्तास्थापनेपूर्वीच राजकारण तापले आहे.
Eknath Khadse : सावदा पोलीस ठाण्यात खडसे आणि पोलीस अधिकाऱ्यात वाद? शिवीगाळ केल्याचा आरोप, एकनाथ खडसेंवर गुन्हा दाखल
स्वतंत्र गट नोंदणीमुळे भाजपने आपली ताकद दाखवत पुढाकार घेतल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समित्यांच्या पदांसाठी आगामी काळात कोणते समीकरण जुळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्वतंत्र गट नोंदणीने “सत्ता कुणाची?” हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
बैठकीनंतर बोलताना पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, जनतेने दिलेला कौल हा विकासासाठी असून भाजपचे सर्व नवनिर्वाचित सदस्य एकत्रितपणे जिल्ह्याच्या विकासासाठी काम करतील. वैकुंठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यात विकासकामांना गती दिली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजप सत्तास्थापनेच्या चर्चेत असला तरी सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावणे हेच पक्षाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Nanded Mayor : शिक्षिका ते महापौर, प्रेरणादायी प्रवास, नांदेडमध्ये इतिहास घडला
या बैठकीस भाजप नेते आस्वाद पाटील, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गट) कोणती भूमिका घेतात, त्यावर रायगड जिल्हा परिषदेत सत्तेचा तोल कोणाच्या बाजूने झुकतो, हे स्पष्ट होणार आहे.
