मुंबई-अहमदाबाद महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात आंतरराष्ट्रीय नेमबाजाचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी हा अपघात झाला. या अपघातातून कार चालक बचावला आहे. त्याला किरकोळ इजा झाली आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दुर्वेस येथील हेरिटेज डेअरी समोर आज सकाळी दहाच्या सुमारास गुजरातच्या दिशेनं जाणाऱ्या भरधाव फॉर्च्युनर कारनं पुढे असलेल्या अवजड वाहनाला जोरदार धडक दिली. कारच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. या अपघातात कारच्या पुढील भागाचा चेंदामेंदा झाला. कारनं अवजड वाहनाला दिलेली धडक इतकी भीषण होती की चालकाच्या शेजारी बसलेल्या संभाजी पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात कार चालक यश चौधरी किरकोळ जखमी झाला आहे. त्याला उपचारांसाठी मनोरमधील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Panchayat Samiti Elections 2026: ठाकरेंचा ‘तो’ शिलेदार 1 मतानं जिंकलाच नाही, तर…; विषय गाजला, पण निकाल नक्की काय लागला?
आंतरराष्ट्रीय नेमबाज असलेले संभाजी पाटील अहमदाबादला प्रशिक्षणासाठी निघाले होते. त्यावेळी हा अपघात झाला. पोलिसांनी कार चालकाच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाजीच्या अकाली निधनानं राज्याच्या क्रीडा विश्वातून हळहळ व्यक्त होत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतानं प्रतिनिधीत्व करणारे संभाजी पाटील बालेवाडीतील क्रीडा संकुलात क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते अहमदाबादला प्रशिक्षणासाठी निघाले होते. त्यावेळी वाटेत त्यांच्या कारला भीषण अपघात झाला.
ZP Election 2026 Result: मुख्यमंत्र्यांना जाऊन विचार, मी कोण ते! शिंदेंचा शिलेदार थेट नडला; सर्व जागा जिंकत भाजपला धक्का
संभाजी पाटील यांनी राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत अनेक महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये पदक विजेती कामगिरी केली होती. २०१८ मध्ये ५३ व्या ऑल इंडिया रेल्वे शूटिंग स्पर्धेत २५ मीटर पिस्तुल प्रकारात त्यांनी सांघिक सुवर्ण पदक जिंकलं होतं. २०१९ मध्ये ५४ व्या ऑल इंडिया रेल्वे शूटिंग स्पर्धेत त्यांनी वैयक्तिक २५ मीटर शूटिंग स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली. २०२० मध्ये पुण्यात झालेल्या मध्य रेल्वे आयोजित चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण पदकावर नाव कोरलं होतं. राज्य, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये ते सातत्यानं सहभागी व्हायचे. त्यांच्या निधनानं हळहळ व्यक्त केली जात आहे.
