पेझारी संस्थान खालसा; भाजप–शेकापला धक्का, अलिबाग राजकारणात घराणेशाहीला मतदारांनी नाकारले
शहापूर गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित नाईक यांनी तब्बल ८,९०८ मते मिळवत दणदणीत विजय मिळवला. या लढतीत त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सुभाष पाटील ऊर्फ पंडित पाटील यांचे पुत्र सवाई पाटील, शिवसेना शिंदे गटाचे गिरीश पाटील तसेच शेकापचे उमेदवार यांचा पराभव केला. विशेष म्हणजे माजी आमदारांचे पुत्र असलेल्या सवाई पाटील यांना अत्यल्प मते मिळाल्याने ते चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. या निकालामुळे पाटील कुटुंबाच्या राजकीय प्रभावाला मोठा धक्का बसल्याची चर्चा अलिबाग तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात रंगली आहे. शहापूरचा हा निकाल केवळ एका गटापुरता मर्यादित नसून, बदलत्या राजकीय प्रवाहाचे प्रतीक मानला जात आहे.
दरम्यान, आंबेपूर जिल्हा परिषद गटातही भाजपला जोरदार झटका बसला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या रसिका केणी यांनी भाजपच्या महिला आघाडी अध्यक्षा व माजी जिल्हा परिषद सभापती चित्रा पाटील यांचा तब्बल ४,५१५ मतांनी दणदणीत पराभव केला.
Mawal ZP Election Result : ‘दादांची उणीव भासतेय…’; मावळच्या ‘क्लीन स्वीप’नंतर आमदार सुनील शेळके भावुक, विरोधकांवर प्रहार
चित्रा पाटील या माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांच्या सुनबाई असूनही मतदारांनी त्यांना स्पष्ट नकार दिला. या निकालामुळे अलिबाग तालुक्यात भाजपच्या संघटनात्मक ताकदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पेझारी संस्थानाच्या प्रभावाला निर्णायक धक्का बसल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
या निवडणुकीत अलिबाग तालुक्यात मतदारांनी घराणेशाही, जुने राजकीय गणिते आणि पारंपरिक प्रभावांना नाकारत बदलाचा कौल दिला असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहापूर व आंबेपूर या दोन्ही गटांतील निकालांमुळे अलिबाग तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलण्याची चिन्हे दिसत असून, आगामी काळात जिल्हा परिषद व स्थानिक राजकारणात नव्या नेतृत्वाची भूमिका अधिक ठळक होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
