राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांच्या घशाला संसर्ग झाला आहे. ते बारामतीहून पुण्याला जायला निघाले आहेत.
२८ जानेवारीच्या सकाळी विमान अपघातात अजित पवारांचं निधन झालं. या अकाली निधनानं पवार कुटुंबाला मोठा धक्का बसला. या घटनेनंतर कुटुंब प्रमुख शरद पवार बरेच सक्रिय झालेले दिसले. गेल्या काही दिवसांत त्यांनी पुणे-मुंबई, मुंबई-पुणे असा प्रवास अनेकदा केला आहे. बऱ्याचदा ते बारामतीलादेखील गेले आहेत. सतत दगदग केल्यानं त्यांना त्रास झाल्याची माहिती आहे. शरद पवारांना खोकल्याचा त्रास होत आहे. त्यामुळे ते बारामतीहून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिककडे जायला निघाले आहेत. तिथे त्यांच्यावर उपचार होतील.
२८ जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चार्टर्ड विमानाला बारामतीत अपघात झाला. लँडिंग करताना विमान कोसळलं. धावपट्टीपासून अवघ्या ५० मीटर अंतरावर विमान दुर्घटनाग्रस्त झालं. त्यात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अजित पवारांच्या मृत्यूनं शरद पवार यांच्यावर मोठा मानसिक आघात झाला. अजित पवारांच्या अकाली निधनामुळे कुटुंबाला बसलेल्या धक्क्यातून त्यांना सावरण्यासाठी शरद पवार सक्रिय झाले.
गेल्या दहा दिवसांत शरद पवार यांनी बराच प्रवास केला आहे. त्यांची बरीच धावपळ झाली आहे. दगदग जास्त झाल्यानं त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला. त्यांच्या घशाला संसर्ग झाला आहे. त्यामुळे खोकल्याचा त्रास होत आहे. उपचार घेण्यासाठी शरद पवार पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकला रवाना झाले आहेत. काही वेळातच ते रुग्णालयात पोहोचतील. तिथे त्यांच्यावर उपचार केले जातील. सुप्रिया सुळे यांच्या सोबत शरद पवार बारामतीहून पुण्याला जात आहेत. अजित पवार यांच्या तेराव्याचा विधी असल्यानं आज बारामतीत पवार कुटुंबातील जवळपास सगळं कुटुंब उपस्थित आहे.
