• Tue. Sep 22nd, 2026

रामलिंग नगर गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद २०२६’ अंतर्गत शासकीय योजनांची माहिती – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 22, 2026

सोलापूर, दि. २१ (जिमाका) : माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने विजापूर रोड येथील रामलिंग सोसायटी, रामलिंग नगर गणेशोत्सव मंडळ येथे लोकसंवाद २०२६ कार्यक्रमांतर्गत नागरिकांना विविध शासकीय योजना, उपक्रम आणि लोककल्याणकारी कार्यक्रमांची माहिती देण्यात आली. या माध्यमातून शासनाच्या योजना व उपक्रमांची माहिती नागरिकांना त्यांच्या परिसरातच मिळत असल्याने नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष अजिंक्य कुलकर्णी यांनी केले.

प्रारंभी माहिती कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक मिलिंद भिंगारे यांनी लोकसंवाद २०२६ कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. शासनाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविणे, पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देणे आणि नागरिकांमध्ये शासकीय कार्यक्रमांविषयी जनजागृती निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, महिला व बालकल्याण, कृषी, रोजगार, कौशल्य विकास तसेच नागरिकांसाठीच्या अन्य लोककल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली. पात्र लाभार्थ्यांनी संबंधित विभागांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांसह योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. नागरिकांनी शासकीय योजनांची माहिती इतरांपर्यंत पोहोचवून जनजागृतीस हातभार लावावा, असेही सांगण्यात आले.

सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने गणेशोत्सव हा राज्य उत्सव म्हणून साजरा केला जात आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन, सांस्कृतिक जतन, पर्यावरण संवर्धन आणि लोकसहभाग वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. गणेश मंडळे तसेच नागरिकांनी आपल्या घरातील गणपती बाप्पाचे फोटो, व्हिडिओ, कथा आणि रील्स ‘बाप्पा डॉट ओआरजी’ (bappa.org)या संकेतस्थळावर अपलोड करावेत, असेही त्यांनी सांगितले.

या माध्यमातून गणेशोत्सवातील भक्ती, परंपरा, सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक वैविध्य व्यापक स्तरावर पोहोचण्यास मदत होणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या गणेशोत्सवाची माहिती या डिजिटल व्यासपीठावर नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले.

रामलिंग नगर गणेशोत्सव मंडळाच्या वतीने लोकसंवाद २०२६ कार्यक्रमाचे स्वागत करण्यात आले. शासनाच्या योजना व उपक्रमांची माहिती नागरिकांना त्यांच्या परिसरातच मिळाल्याने त्याचा लाभ घेणे सुलभ होत असल्याचे मंडळाचे अध्यक्ष अजिंक्य कुलकर्णी यांनी सांगितले. उपाध्यक्ष नागेश कोळी, ईश्वर बिराजदार आणि मार्गदर्शक गणेश कोळी यांनीही नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन इतरांनाही त्याबाबत माहिती द्यावी, असे आवाहन केले.

मंडळाचे अध्यक्ष अजिंक्य कुलकर्णी, उपाध्यक्ष नागेश कोळी व ईश्वर बिराजदार तसेच मंडळाचे मार्गदर्शक गणेश कोळी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, परिसरातील नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed