• Tue. Sep 22nd, 2026

Manoj Jarange Patil: मराठ्यांनी मान उंच करायला लावली, आता रडायलाही लावू; मिशीवर ताव मारत मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेंना इशारा

सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा तीव्र आणि आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात उपचार सुरू असतानाही, छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयातून पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. उपमुख्यमंत्री शिंदेंची खास शैली करत आणि स्वतःच्या मिशीवर ताव मारत जरांगेंनी सरकारला थेट आव्हान दिले आहे.

पत्रकार परिषदेत निशाणा साधताना मनोज जरांगे म्हणाले, “एकनाथ शिंदे यांची शान या पठ्याने वाढवली आहे. त्यांना मुंबईत मान उंच करायला लावणारे हेच मराठे आहेत. पण आज तेच शिंदे मराठा आंदोलकांचा बदला घेत आहेत. आमच्या लोकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत, आयकर आणि इतर यंत्रणांद्वारे चौकशा लावल्या जात आहेत. पण लक्षात ठेवा, तुमची ही सत्ता कायम राहणार नाही. २०२९ ची निवडणूक जवळ आली आहे, आम्ही रडायला लावायला मागे हटणार नाही.”

​”जेलमध्ये गेलो तरी चालेल पण वाकणार नाही”

सरकारकडून आंदोलकांची आणि त्यांना मदत करणाऱ्यांची होत असलेल्या अडवणुकीवर भाष्य करताना जरांगे अत्यंत आक्रमक झाले. “ज्याला कर नाही त्याला डर कशाला! सरकार आम्हाला जेलमध्ये टाकण्याची वाट पाहत असेल, तर आम्ही जेलमध्ये जायलाही तयार आहोत. पण मराठा समाज किंवा मी कोणासमोरही वाकणार नाही,” असा एल्गार त्यांनी पुकारला.

​कुणबी नोंदींसाठी मोडी व फारसी वाचकांना विशेष अधिकार

यावेळी जरांगे यांनी कुणबी नोंदी शोधण्याबाबत शासनाने जारी केलेल्या महत्त्वाच्या परिपत्रकाची माहिती दिली. मोडी व फारसी लिपी वाचकांच्या समितीला नोंदी शोधण्यासाठी सरकारने विशेष अधिकार देणारा जीआर काढला आहे. राज्यातील मोडी व फारसी लिपीच्या सर्व अभ्यासक आणि वाचकांनी २३ ते २७ सप्टेंबर दरम्यान संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात येऊन आपली नावे नोंदवावीत. मराठवाड्यातील प्रत्येक तालुक्यात २ मोडी व २ फारसी वाचक नेमले जाणार आहेत, असे आवाहन त्यांनी केले.

​मनोज जरांगे पाटील यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे

​कॅबिनेट बैठकीवर गंभीर आरोप: मराठ्यांच्या विरोधात रणनीती आखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट बैठक घेतली आणि त्यानंतर मंत्र्यांकडून आमच्या लोकांना फोन करून धमकावले जात आहे, असा आरोप जरांगेंनी केला.

​अधिकार आणि पुरावे शोधमोहीम: सातारा, कोल्हापूर, त्र्यंबकेश्वर, बाजारपेठ, कारागृह व लस नोंदणी अशा विविध ठिकाणी जाऊन वंशावळीचे जुने पुरावे शोधण्यासाठी समाजाने एकत्र येऊन योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.