• Mon. Mar 9th, 2026
    Sangli News: बलगवडे ग्रामस्थांनी मतदानाकडे फिरवली पाठ; शून्य मतदानाची नोंद, बहिष्काराचे कारण आहे तरी काय?

    सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील बलगवडे गावात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर ग्रामस्थांनी एकजुटीने बहिष्कार टाकला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्वप्निल एरंडोलिकर, सांगली (तासगाव): लोकशाहीच्या उत्सवात जिथे एका एका मतासाठी उमेदवार देव पाण्यात घालून बसलेले असतात, तिथे सांगलीच्या तासगाव तालुक्यातील बलगवडे ग्रामस्थांनी एक वेगळाच इतिहास रचला आहे. आपल्या हक्कासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी पूर्ण गावाने एकजुटीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर शंभर टक्के बहिष्कार टाकला. २,३०० मतदार असलेल्या या गावात सकाळपासून मतदान संपेपर्यंत एकाही मताची नोंद झाली नाही, ज्यामुळे संपूर्ण प्रशासन हादरून गेले आहे.

    नेमकं काय आहे वादाचे कारण?

    बलगवडे येथील गायरान जमिनीवर उभारण्यात येत असलेला सौर ऊर्जा प्रकल्प आणि त्यासाठी करण्यात आलेली बेसुमार वृक्षतोड या विरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे. गावातील निसर्ग संपदा नष्ट करून लादण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जोपर्यंत सौर प्रकल्प हटवला जात नाही आणि वृक्षतोड करणाऱ्यांवर कडक कारवाई होत नाही, तोपर्यंत मतदान करणार नाही, असा पवित्रा गावाने घेतला होता.

    रोहित पाटलांची मध्यस्थीही अपयशी

    निवडणूक प्रक्रियेसाठी गावात दोन मतदान केंद्रे सज्ज होती. मतदारांना केंद्रापर्यंत आणण्यासाठी निवडणूक प्रशासनाने दिवसभर प्रयत्न केले. इतकेच नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे युवा आमदार रोहित पाटील यांनीही गावात धाव घेऊन ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

    Maharashtra TimesIND vs USA: वर्ल्ड कपच्या पहिल्या मॅचमध्ये भारताला झटक्यावर झटके, अमेरिकेचा अविश्वसनीय पराक्रम, पावर प्लेमध्ये घडलं तरी काय

    मात्र, “आमचा लढा निसर्गासाठी आहे,” असे म्हणत ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. परिणामी, सायंकाळी मतदान यंत्रे सीलबंद होईपर्यंत एकाही व्यक्तीने मतदानाचा हक्क बजावला नाही.

    एकाही मतदाराने केंद्राकडे न फिरकल्यामुळे बलगवडे गावाने प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना मोठी चपराक लगावली आहे. गावाच्या या एकजुटीची चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहे. पर्यावरणासाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याची ही दुर्मिळ घटना सांगलीच्या राजकीय इतिहासात नोंदवली गेली आहे.

    दरम्यान, अशाच प्रकारची आणखी एक घटना परभणी जिल्ह्यातूनही समोर येते आहे. सेलू तालुक्यातील बोथ गावाला करपरा नदीवरील पूल नसल्यामुळे येथील नागरिकांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. त्यामुळे जोपर्यंत गावाला पूल होत नाही. तोपर्यंत आम्ही कोणत्याही मतदान प्रक्रियेत मतदान करणार नाही, अशी भूमिका येथील ग्रामस्थानी घेतली होती. शनिवारी(दि. ७)झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मतदानासाठी येथील एकही मतदार मतदान केंद्राकडे फिरकला सुद्धा नाही. यांतून शासन व प्रशासनाविरूद्ध असलेला रोष बोथ ग्रामस्थांचा दिसून आला.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा