• Sat. Mar 7th, 2026

    Kolhapur Accident: कोल्हापुरात थरार! क्रेटाची दुचाकीस्वारांना भीषण धडक आणि…; शाहू मिल चौकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात

    Kolhapur Accident: कोल्हापुरात थरार! क्रेटाची दुचाकीस्वारांना भीषण धडक आणि…; शाहू मिल चौकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात

    भरधाव क्रेटाने दुचाकीला उडवलं, कार रस्त्यातच पलटी झाली तर दोन दुचाकीस्वारांचा दुर्दैवी मृत्यू

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    कोल्हापूर: ऐन वर्दळीच्या वेळी कोल्हापुरातील शाहू मिल चौक नेहमीप्रमाणे गजबजलेला होता. वाहनांची ये जा सुरू होती आणि लोक आपल्या कामात मग्न होते. पण, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. अचानक एका भरधाव वेगातील क्रेटा कारने शांतता भंग केली आणि एका भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला. हा अपघात इतका भीषण होता की, तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या अंगावर काटा आला.

    नेमकं काय घडलं?

    प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एक पांढऱ्या रंगाची क्रेटा कार प्रचंड वेगात चौकाकडे आली. समोरून येणाऱ्या दुचाकीला या कारने इतक्या जोरात धडक दिली की, दुचाकीस्वार हवेत अनेक फूट उंच उडून दूरवर फेकला गेला. ही धडक साधी नव्हती तर ती मृत्यूच बनून आली होती. कारची गती इतकी अनियंत्रित होती की, दुचाकीला उडवल्यानंतर क्रेटा कारने स्वतःवरचे नियंत्रण गमावले आणि ती रस्त्याच्या मधोमध एखाद्या खेळण्यासारखी उलटी झाली.

    दृश्य पाहून काळीज कापलं!

    अपघातानंतरचे दृश्य अतिशय भयावह होते. ज्या दुचाकीला धडक बसली, तिचा अक्षरशः चक्काचूर झाला. धडकेमुळे दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला असलेल्या पडिक जागेत जाऊन कोसळले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या तरुणांना पाहून मदतीसाठी धावलेल्या लोकांच्याही पायाखालची जमीन सरकली. दुसरीकडे, रस्त्याच्या मधोमध पलटी झालेली कार आणि चारी बाजूंना विखुरलेले काचेचे तुकडे अपघाताची भीषणता सांगत होते.

    Maharashtra TimesZP Election : याला म्हणतात जबाबदार नागरीक! नवरदेवाचं मतदान केल्यानंतरच वऱ्हाड निघालं लग्नाला

    रुग्णालयात मृत्यूशी झुंज अपयशी

    घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने रुग्णवाहिकेला पाचारण केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमींना तातडीने सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. उपचारादरम्यान दोन्ही दुचाकीस्वारांची प्राणज्योत मालवली.

    पोलिसांची धाव आणि वाहतूक कोंडी

    अपघातामुळे शाहू मिल चौकात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती, ज्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. पोलिसांनी तातडीने क्रेन बोलावून पलटी झालेली क्रेटा कार बाजूला केली आणि रस्ता मोकळा केला. हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की चालकाच्या बेदरकारपणामुळे, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा