• Mon. Jun 15th, 2026

    Mumbai Water Supply Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ‘या’ दिवशी पाणी येणार नाही, काही ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा

    Mumbai Water Supply Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ‘या’ दिवशी पाणी येणार नाही, काही ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा

    मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. येत्या मंगळवारी मुंबईतील काही भागांमध्ये पाणी येणार नाही. त्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाकडून आवश्यक पाणीसाठा करुन ठेवण्याचा आणि पाण्याचा अतिवापर टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, मुंबई : मुंबईकरांसाठी उन्हाळ्याच्या सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आगामी काळात उकाडा वाढणार आहे. त्यामुळे या उन्हाळ्यात पाण्याची तहानदेखील तितकीच लागणार आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्याची सुरुवात होताच मुंबईत उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे. अशा परिस्थितीत पाण्याची कमतरता अधिक जाणवू शकते. कारण वांद्रे पश्चिम आणि खार परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची आणि अडचणीची बातमी समोर आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने वांद्रे पश्चिम येथील ९०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीचे अत्यावश्यक काम हाती घेतले आहे. त्यामुळे मंगळवार, १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत तब्बल १४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. काही भागांत पाणीपुरवठा पूर्णतः खंडित राहील, तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणी मिळणार आहे.

    मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, पाली हिल जलाशयाच्या ९०० मि.मी. आवक (इनलेट) जलवाहिनीवर गळती आढळून आली आहे. त्यामुळे ती दुरुस्ती करणं आवश्यक आहे. हे काम वांद्रे पश्चिमेतील कुरेशी नगर झोपडपट्टीजवळील एमएचएडीएच्या मोकळ्या भूखंडातून तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गालगत जाणाऱ्या जलवाहिनीवर करण्यात येणार आहे. या दुरुस्तीमुळे एच-पश्चिम विभागातील मोठ्या परिसरावर पाणी पुरवठ्याचा परिणाम होणार आहे.

    ‘या’ भागांना बसणार पाणी कपातीचा फटका

    वांद्रे पश्चिमेकडील हिल रोड, पाली हिल, कार्टर रोड, सेंट अँड्र्यूज मार्ग, पाली गाव, चिंबई, शेर्ली गाव, कांतवाडी तसेच खार दांडा, कोळीवाडा, दांडा पाडा, चुईम गावठाण, खार पश्चिमेतील काही भागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. याशिवाय माउंट मेरी परिसर, के.सी. मार्ग, बाजार रस्ता, पाली माला, कोल डोंगरी, नर्गिस दत्त मार्ग अशा भागांनाही पाणीकपातीचा फटका बसणार आहे.

    ‘या’ भागांमध्ये कमी दाबाने पाणी येणार

    दरम्यान, हिल रोडच्या टोकापासून ताज लँड्स एन्ड, बी. जे. मार्ग, एच.के. भाभा मार्ग, काणे मार्ग आणि गणेश झोपडपट्टी परिसरात मध्यरात्रीनंतर १ ते पहाटे ४.३० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना खबरदारीचा इशारा दिला आहे. आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा, दुरुस्ती कालावधीत काटकसरीने पाणी वापरावे तसेच पुढील काही दिवस पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असेही पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा