• Tue. Jun 30th, 2026

    महापौर पदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट, अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला?

    ByMH LIVE NEWS

    Feb 4, 2026
    महापौर पदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट, अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला?

    छत्रपती संभाजीनगर 

    महापौर, उपमहापौरपदासाठी बुधवारपासून उमेदवारी अर्जाचे वितरण आणि दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी महापालिकेत एकहाती सत्ता मिळविणाऱ्या भाजपकडून अद्यापही उमेदवार कोण? याबाबत घोषणा मात्र झाली नाही. स्थानिक नेत्यांचे एकमत न झाल्याने अखेर गटनेता, महापौर, उपमहापौरपदासाठी प्रत्येकी तीन ते चार नावांची यादी वरिष्ठांकडे मंगळवारी पाठविण्यात आली असून गुरुवारी प्रदेशस्तरावरुन निर्णय होईल, अशी माहिती भाजप नेत्यांनी दिली. दरम्यान, इच्छुकांची गर्दी, त्यात काही स्थानिक नेत्यांनी काही नावासाठी केलेला आग्रह यामुळे तोडगा काढण्यासाठी महापौरपदासाठी सव्वा-सव्वा वर्षाचा फार्म्युला असू शकतो, अशी चर्चा देखील रंगू लागली आहे.

    छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर साडेतीन दशकांपेक्षा जास्त काळापासून शिवसेना भाजपचीच सत्ता राहिली आहे. अपवाद वगळता सर्व निवडणुका युती म्हणूनच लढल्या गेल्या. यात भाजपची भूमिका नेहमीच छोट्या भावाची राहिली. १९८८ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला एकही जागा जिंकता आली नव्हती. परंतु नुकत्याच झालेल्या निवडणुकीत स्वबळावर रिंगणात उतरलेल्या भाजपने ११५ जागांपैकी तब्बल ५७ जागांवर यश मिळवत महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवली. विशेष म्हणजे महापालिकेच्या स्थापनेपासून कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळविता आले नाही. ही किमया भाजपने करुन दाखविली.

    विकसित छत्रपती संभाजीनगर असा मुद्दा प्रचार मांडणारे भाजप विजयाचा गुलाल उडविल्यानंतर तातडीने महापौर, गटनेता आदी पदाचे नाव निश्चित करेल, अशी अपेक्षा होती. परंतु कोणा एका नावावर स्थानिक नेत्यांचे एकमत न झाल्याने अखेर कोअर कमिटीने महापौरसह अन्य पदासाठी नावाची यादी प्रदेश नेत्यांकडे मंगळवारी सादर केली. याबाबत बुधवारी निर्णय होईल, अशी अपेक्षा होती. परंतु सायंकाळपर्यंत वरिष्ठ पातळीवरुन निरोप न आल्याने उद्या गुरुवारी नावाची घोषणा होईल, असे भाजपच्या सूत्रांनी नमूद केले. यासंदर्भात शहराध्यक्ष किशोर शितोळे यांना संपर्क साधला असता त्यांनी गुरुवारी दुपारपर्यंत नावे प्रदेशाकडून निश्चित होईल, असे नमूद केले.

    दरम्यान, महापौर हे खुल्या प्रवर्गासाठी आहे. त्यात इच्छुकांची संख्या देखील अधिक असून त्यापैकी काही नावांसाठी स्थानिक नेत्यांचा देखील आग्रह असल्याचे बोलले जात आहे. यावर तोडगा म्हणून महापौरपदासाठी सव्वा-सव्वा वर्षाचा फार्म्युला असेल, अशी चर्चा होत असून याबाबत मात्र अधिकृत तपशील समजू शकला नाही.

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed