• Tue. Jun 30th, 2026

    आपत्ती व्यवस्थापनात समाजमाध्यमांचा प्रभावी वापर महत्वाचा – संचालक डॉ. किशोर गांगुर्डे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 29, 2026
    आपत्ती व्यवस्थापनात समाजमाध्यमांचा प्रभावी वापर महत्वाचा – संचालक डॉ. किशोर गांगुर्डे – महासंवाद

    मुंबई, दि. २९ : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनासाठी केवळ प्रत्यक्ष यंत्रणाच नव्हे, तर अधिकृत सोशल मीडिया माध्यमेही प्रभावीपणे कार्यरत असणे आवश्यक आहे. शासकीय कार्यालये, महापालिका आणि विविध विभागांनी आपली अधिकृत सोशल मीडिया हँडल्स सक्रिय ठेवून नागरिकांना वेळोवेळी अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन संचालक (माहिती) (प्रशासन) डॉ. किशोर गांगुर्डे यांनी केले.

    पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापनाबाबत मुंबईतील सर्व यंत्रणांच्या विभागांच्या जनसंपर्क अधिकारी यांची बैठक दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली. या बैठकीत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती)  (प्रशासन) डॉ. किशोर गांगुर्डे बोलत होते, बैठकीला संचालक(माहिती) (वृत्त व जनसंपर्क) गोविंद अहंकारी, उपसंचालक (माहिती) वर्षा आंधळे, प्र. उपसंचालक (प्रशासन) डॉ. जगदीश मोरे व मुंबईतील विविध शासकीय यंत्रणांचे जनसंपर्क अधिकारी उपस्थित होते.

    संचालक डॉ. किशोर गांगुर्डे म्हणाले की, यंदा अद्याप पावसाची सुरुवात झालेली नसली, तरी पावसाळ्यापूर्वीच सर्व यंत्रणांनी आवश्यक तयारी पूर्ण करणे गरजेचे आहे. मुंबई महापालिका, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, पनवेल, नवी मुंबई, वसई-विरार, पालघर महापालिका तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) अशा संस्थांच्या जनसंपर्क अधिका-यांनी आपापल्या स्तरावर केलेल्या उपाययोजनांची माहिती नागरिकांपर्यंत नियमितपणे पोहोचवावी. आपत्तीच्या काळात अधिकृत माहिती नागरिकांपर्यंत पोहोचण्यास विलंब झाल्यास अफवा आणि चुकीची माहिती सोशल मीडियावर वेगाने पसरते. त्यामुळे सर्व शासकीय कार्यालये आणि महापालिकांनी आपली अधिकृत सोशल मीडिया हँडल्स वेळीच तपासून घ्यावीत आणि त्यांचा नियमित वापर करावा.

    संचालक डॉ. गांगुर्डे म्हणाले की पूर, मुसळधार पाऊस किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने सूचना, इशारे, वाहतूक बदल, बचाव कार्याची माहिती आणि आवश्यक मार्गदर्शन यासाठी सोशल मीडिया हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागासह सर्व संबंधित शासकीय विभागांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांवर अधिक सक्रिय राहून नागरिकांशी सातत्याने संवाद साधावा. पावसाळ्याच्या काळात विश्वासार्ह आणि अधिकृत माहितीचे जलद प्रसारण झाल्यास अफवांवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच नागरिकांची सुरक्षितता आणि प्रशासनावरील विश्वासही अधिक दृढ होईल, असेही  डॉ. गांगुर्डे यांनी सांगितले.

    आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – संचालक गोविंद अहंकारी

    संचालक गोविंद अहंकारी म्हणाले की, कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यानंतर खुलासे करण्याची वेळ येऊ न देता संबंधित विभागांनी स्वतःहून तत्काळ, अचूक आणि पारदर्शक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी. त्यामुळे जनतेची गैरसोय टळेल, अफवांना आळा बसेल आणि शासनाविषयीचा अनावश्यक रोषही कमी होईल. दरवर्षी पावसाळ्यात विविध प्रकारच्या आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होतात.

    एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेची किंवा इतर कोणत्याही यंत्रणेची चूक असली तरी नागरिकांचा रोष शासनावर व्यक्त होतो. त्यामुळे प्रत्येक विभागाने अशा परिस्थितीकडे अत्यंत गांभीर्याने पाहून पूर्वतयारी ठेवणे आवश्यक आहे.

    संचालक गोविंद अहंकारी म्हणाले की, रेल्वे सेवा, वीजपुरवठा, पाणी साचणे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे अडचणी निर्माण झाल्यास त्या संदर्भातील माहिती नागरिकांना वेळेवर देणे गरजेचे आहे. कोणत्या मार्गावर वाहतूक विस्कळीत आहे, कोणत्या रेल्वेगाड्या उशिराने धावत आहेत, कोणत्या भागात पाणी साचले आहे किंवा नागरिकांनी कोणते मार्ग टाळावेत, याची माहिती तत्काळ प्रसिद्ध केल्यास नागरिक योग्य नियोजन करू शकतात, ही माहिती व्हॉटसअप ग्रुपव्दारे, आकाशवाणी तसेच समाजमाध्यमांच्या माध्यमातून त्वरित प्रसारित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सतर्कता बाळगून सूचना देणे अधिक प्रभावी ठरते, असे त्यांनी स्पष्ट केले.

    मुंबईतील विविध शासकीय व निमसकीय यंत्रणांच्या जनसंपर्क अधिकारी यांनी यावेळी आपत्कालीन कालावधीत घ्यावयावची खबरदारी व करावयाच्या कामांची माहिती सादर केली.

    0000

    संध्या गरवारे/विसंअ

     

     

     

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed