ST Bus : ‘पुण्याच्या आगारांतून प्रवाशांच्या सोईसाठी पुणे एसटी विभागाने रात्री मुक्कामी बस वाढवल्या आहेत. त्या दररोज अनेक प्रवाशांना फायदा होत आहे’, असं एसटी विभागाचे वाहतूक अधिकारी कमलेश धनराळे यांनी म्हटलं आहे.
सव्वादोन कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न
पुणे एसटी विभागातून राज्याच्या कानाकोपऱ्यात बस धावतात. पुणे विभागाकडे सध्या ९२०बस असून, त्यापैकी ८५० बस मार्गावर असतात. यातून एसटीला दररोज सव्वादोन कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळते. एसटीकडून लांब पल्ल्याबरोबरच जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या गावांना ‘शटल बस’मार्फत सेवा दिली जाते. पुणे जिल्ह्यात अजूनही अनेक गावे दुर्गम भागात असल्यामुळे त्यांना तालुका व जिल्ह्याशी जोडणारा महत्त्वाचा दुवा ‘लालपरी’च आहे. त्यामुळेच एसटी महामंडळाने रात्री उशिरा गावी जाण्यासाठी आणि सकाळी परत येण्याची सोय व्हावी म्हणून अनेक गावात मुक्कामी बसची संख्या वाढवली आहे. त्याचा दुर्गम भागातील अनेक गावांना मोठा फायदा होत आहे. स्वारगेट, बारामती, दौंड, शिरूर, सासवड, नारायणगाव अशा आगारांतून रात्रीच्या मुक्कामी बसची संख्या मोठी आहे.
Vijaymala Pawar : आईच्या मनाला मोठी वेदना, भावना बाजूला ठेवून कर्तव्याला प्राधान्य; नसरापूर केसमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची भावूक प्रतिक्रिया
एसटीचा सुरक्षित आसरा
दुर्गम भागात रात्रीच्या वेळी प्रवास करणे आजही एक मोठे आव्हान असते. खासगी वाहने रात्रीच्या वेळी जादा पैसे उकळतात, शिवाय सुरक्षिततेची कोणतीही हमी नसते. अशा परिस्थितीत, रात्रीच्या वेळी गावाची वेस ओलांडून मंद प्रकाशात गावात येणारी एसटी ग्रामीण जनतेला मोठा दिलासा देते. शाळा-कॉलेज सुटल्यानंतर अंधारात घरी परतणाऱ्या विद्यार्थिनी असोत, की कामावरून उशिरा घरी येणारे चाकरमानी, एसटी गावात मुक्कामी येत असल्याने पालकांची चिंता मिटली आहे. सकाळी लवकर दूध, भाजीपाला घेऊन शहरात जाणारे शेतकरी आणि शाळा गाठणारे विद्यार्थी यांच्यासाठी ही मुक्कामी बस आधार ठरत आहे. वाहतुकीची आधुनिक साधने कितीही वाढली, तरी गाव आणि ‘लालपरी’ यांचे नाते अतूट आहे. पुणे विभागाने वाढवलेल्या या मुक्कामी फेऱ्या केवळ वाहतुकीची सोय नसून, दुर्गम भागातील शेवटच्या घटकाला सुरक्षित प्रवासाची दिलेली खात्री आहे.
चालक-वाहकांना मुक्काम भत्ता
मुक्कामी एसटीचे हे चक्र अविरत चालवण्यासाठी चालक आणि वाहक आपल्या कुटुंबापासून दूर राहून सेवा देतात. दुर्गम भागात रात्री थांबताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. एसटी महामंडळ त्यांना विशेष ‘रात्रीचा मुक्काम भत्ता’ देते. सध्या चालकाला ८० रुपये भत्ता दिला जात असून, तो देखील वाढवण्याची मागणी होत आहे. या भत्त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या जेवणाची सोय होते. वाहक व चालकांना काही ठिकाणी राहण्यासाठी शाळेची खोली दिली जाते, तर काही ठिकाणी चालक-वाहकांना बसमध्येच रात्र काढावी लागते.
Mayank Lohar: रोशनचा पुरावा मिटवण्याचा प्रयत्न, पोलिसांना तीन कामगारांची मदत, लोकलमधील ‘त्या’ व्हिडीओमुळे महत्त्वाचा उलगडा
पुणे विभागातील एकूण बस – ९२०
मार्गांवर धावणाऱ्या बस – ८५०
मुक्कामी बस – २६०
सव्वादोन कोटींपेक्षा जास्त दररोज मिळणारे उत्पन्न
