• Tue. Jun 30th, 2026

    पावसाळ्यातील खोळंबा टाळण्यासाठी मध्य रेल्वेची तयारी; २१० पंप कार्यान्वित, लोकल प्रवासाला दिलासा

    पावसाळ्यातील खोळंबा टाळण्यासाठी मध्य रेल्वेची तयारी; २१० पंप कार्यान्वित, लोकल प्रवासाला दिलासा

    म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी भरण्याच्या घटना रोखण्यासाठी मध्य रेल्वेची भिस्त पंपावरच असणार आहे. पावसाच्या पाण्याचा वेगाने उपसा करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने २१० पंप कार्यान्वित केले आहेत. कसारा आणि लोणावळा घाटमार्गावर कोसळणाऱ्या दरडींपासून बचावासाठी जाळी आणि गॅबियन वॉल अशा उपाययोजनांना बळकटी देण्यात आली आहे.

    मान्सून लक्षात घेता मध्य रेल्वेने उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार पावसाळ्यात लोकलसह मेल-एक्स्प्रेस चालवण्यासाठी जलनिस्सारण यंत्रणेचे बळकटीकरण, संवेदनशील ठिकाणांसह घाटमार्गावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मुसळधार पावसात पाणी भरणारी ११७ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. साचणाऱ्या पाण्याचा वेगाने उपसा करण्यासाठी १२.५ अश्वशक्ती ते १०० अश्वशक्तीचे एकूण २१० हेवी ड्युटी पंप कार्यान्वित करण्यात आले आहेत. पाण्याचा निचरा होणाऱ्या गटारे, कल्व्हर्ट आणि पुलांखालील जलमार्गांची स्वच्छता करण्यात आली आहे.

    Weather Update: कोकणात सर्वदूर पाऊस सक्रिय, पुण्यातही मेघगर्जनेसह कोसळणार; ४८ तासांसाठी मुंबई, ठाण्यात ‘ऑरेंज अलर्ट’

    उपनगरी रेल्वे मार्गावरील १८ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. शीव-कुर्ला, चुनाभट्टी-कुर्ला, विक्रोळी-कांजूरमार्ग, कुर्ला-टिळकनगर दरम्यान कायमस्वरूपी उपाययोजनांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित ठिकाणी मायक्रो टनलिंग, रुळांची उंची वाढवणे, पाण्याचा निचरा होणाऱ्या मार्गांमध्ये सुधारणा करणे अशी दीर्घकालीन कामे २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. नुकतेच ठाणे स्थानकात ११० मीटर लांबीचे मायक्रोटनलिंगचे काम पूर्ण झाल्याने ठाण्यातील पाणी भरण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघाला आहे.

    कसारा आणि लोणावळ घाटमार्गावर केलेल्या कामांमुळे २०२४-२५ आणि २०२५-२६मध्ये घाटमार्गावर दरड कोसळून रेल्वे वाहतूक बंद झाल्याची घटना घडली नाही. यंदाही कोकण रेल्वेच्या मदतीने आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. यात दगडरोधक जाळी बसवणे, कुंपण घालणे, बोगद्यांची प्रवेशद्वारे, गॅबियन संरचना उभारणे, संरक्षक भिंतीचे बळकटीकरण अशा उपाययोजनांचा समावेश आहे.

    रेल्वेच्या समस्यांसंदर्भात वाचकांकडून आलेल्या प्रतिक्रिया…

    एसीचे दोन डबे जोडा

    लोकल गाड्या वेळेवर धावत नसल्यामागे गर्दीच्या वेळेत मेल व एक्स्प्रेस गाड्यांना प्राधान्य दिले जाणे हे एक प्रमुख कारण आहे. विशेषतः मध्य रेल्वेवर याचा अधिक परिणाम जाणवतो. त्यातच नव्याने सुरू झालेल्या वातानुकूलित लोकलमुळे प्रवाशांचा गोंधळ वाढला आहे. एसी लोकलचे तिकीट काढल्यानंतर अनेकदा ती गाडी वेळेवर मिळत नाही. परिणामी, साध्या गाडीतून प्रवास करावा लागतो आणि प्रवाशांचे पैसे वाया जातात. स्वतंत्र एसी लोकल चालविण्याऐवजी प्रत्येक गाडीला किमान दोन वातानुकूलित डबे जोडण्याचा पर्याय तपासून पाहावा. त्यामुळे अधिक प्रवाशांना या सुविधेचा लाभ मिळेल, फलाटावरील गर्दी कमी होईल आणि गाड्यांचे वेळापत्रकही कमी प्रमाणात विस्कळीत होईल. – मनोज चव्हाण

    ज्येष्ठांच्या सुरक्षेसाठी उपाय हवेत

    मी कांदिवली येथील ठाकूर व्हिलेजमध्ये राहणारा ज्येष्ठ नागरिक असून, कामानिमित्त मला नियमित मेट्रोने अंधेरीपर्यंत प्रवास करावा लागतो. मात्र, मेट्रोतील आरक्षित आसनांच्या वापराबाबत गंभीर समस्या जाणवत आहे. अनेकदा तरुण प्रवासी, विशेषतः पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी राखीव असलेल्या आसनांवर बसतात. विनंती करूनही ते जागा देण्यास नकार देतात. वाढत्या असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर वाद घालणे धोकादायक वाटते. त्यामुळे पाठदुखी आणि पायांच्या त्रासामुळे उभे राहून प्रवास करावा लागतो. विदेशातील अनेक शहरांमध्ये, विशेषतः लंडनच्या भूमिगत रेल्वेमध्ये, सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियमित गस्त असते. आपल्या लोकल आणि मेट्रो सेवांमध्येही सशस्त्र सुरक्षा दलाची नियुक्ती करून प्रवाशांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आवश्यक आहे.
    – श्रीकांत कुलकर्णी, कांदिवली

    लोकप्रतिनिधींनी प्रवास करावा

    रेल्वे पोलिसांनी स्थानके आणि गाड्यांमध्ये गस्त वाढवावी, महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष पथके नियुक्त करावीत आणि तक्रारींवर त्वरित कारवाई करावी. रेल्वे प्रशासनाने गर्दी कमी करण्यासाठी अधिक फेऱ्या चालवाव्यात, स्थानकांवरील सुविधा सुधाराव्यात, तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी नियमित देखभाल करावी आणि प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. लोकप्रतिनिधी, मंत्री आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या सर्वांचा पाठपुरावा करावा. त्यासाठी स्वतः अचानक लोकलमधून प्रवास करावा व खरी परिस्थिती जाणून घ्यावी. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सर्व लोकल वेळेवर चालवणे आवश्यक आहे. एसी लोकल रद्द करून साध्या लोकलमध्ये तीन एसी डबे बसवल्यास निम्म्या समस्या कमी होतील. – डॉ. विजय आठल्ये, मुलुंड

    Maharashtra TimesST Bus: ‘एसटी’च्या उत्पन्नवाढीसाठी अधिकाऱ्यांना तंबी, महिन्याभराची मुदत; अन्यथा थेट बदली किंवा निलंबनाची कारवाई

    कायदा-सुव्यवस्था सुधारा

    रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारने सर्वांत आधी बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेत सुधारणा करणे गरजेचे आहे. पोलिस भरती तातडीने करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक फलाटावर वस्तूंची तपासणी करण्यासाठी स्कॅनरची गरज आहे. मेट्रो स्थानकावर सर्व तपासण्या होतात. मग रेल्वे स्थानकांवर तसे का होत नाही? तसेच, महिला डब्यात एक महिला पोलिस कर्मचारी तैनात करणे आवश्यक आहे.- संतोष

    प्रथम श्रेणीच्या प्रवाशांचेही हाल

    पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये प्रथम श्रेणी डब्यामध्ये विनातिकीट किंवा द्वितीय श्रेणीचे प्रवासी घुसखोरी करत आहेत. त्यामुळे नियमानुसार जास्त पैसे देऊन प्रथम श्रेणीचे तिकीट किंवा पास काढणाऱ्या प्रवाशांना नाहक मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते. लोकलला अति गर्दी होत असल्याने अवैध प्रवाशांमुळे प्रथम श्रेणीच्या डब्यात प्रचंड गर्दी होते. त्यामुळे महागडे तिकीट काढूनही प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागतो. गर्दीचा फायदा घेऊन पाकीटमारी आणि महिला प्रवाशांची छेडछाड होण्याचा धोका वाढतो. डब्यात चढण्या-उतरण्यावरून प्रवाशांमध्ये वाद होतात. हा त्रास रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अचानक तिकीट तपासणी करावी, टीटीई आणि आरपीएफ तैनात करावेत, गर्दीच्या स्थानकांवर प्रथम श्रेणीच्या डब्याबाहेर रेल्वे सुरक्षा बल किंवा तिकीट परीक्षकांना तैनात करावे, जेणेकरून अवैध प्रवासी चढणार नाहीत. फुकटे किंवा चुकीच्या तिकिटावर प्रवास करणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई करावी. – घनश्याम

    तातडीच्या उपायांची गरज

    पाऊस असो किंवा नसो, तांत्रिक बिघाड नसला तरी वर्षभर लोकल विलंबाने धावत असतात. रेल्वे स्थानकावर एकेका मिनिटाने गर्दी वाढत असताना लोकल १० ते १५ मिनिटांनी उशिराने धावत असतात. त्यातच एसी लोकल दोन-दोन सोडल्या जातात. सीएसटीवरून ठाणे लोकल जास्त सोडल्या जातात. त्यामुळे ठाणे ते पनवेल गाडीमधील प्रवाशांची गर्दी ठाणे स्थानकात वाढते. कल्याण ते पनवेल रेल्वे मार्गावर सध्या मालगाड्या धावतात. कल्याण ते पनवेल रेल्वे मार्गावर लोकल सुरू केल्यास ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची गर्दी कमी होईल. ज्येष्ठ नागरिक डब्यातील जागा मर्यादित असून त्यांना दिव्यांगांच्या डब्यातून प्रवास करावा लागतो. या सर्व समस्यांवर तातडीने उपायांची गरज आहे. – अरुण पराडकर, डोंबिवली

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed