• Sat. Sep 12th, 2026

बडतर्फ पोलिसाचा लॉजवर गूढ मृत्यू

ByMH LIVE NEWS

Feb 2, 2026
बडतर्फ पोलिसाचा लॉजवर गूढ मृत्यू

नाशिक -प्रतिनिधी 

 सराईत गुन्हेगारांसह अमली पदार्थ बाळगणाऱ्यांच्या संपर्कात असल्याने सात महिन्यांपूर्वी नाशिक शहर पोलिस दलातून बडतर्फ केलेल्या तत्कालीन पोलिस कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. इरफान मन्सूर शेख (वय ३५, रा. वडाळागाव) असे मृताचे नाव आहे.

इरफानने आत्महत्या केली, की नशेच्या ‘ओव्हर डोस’ मुळे त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला यासंदर्भातील तपास सुरू आहे. शवविच्छेदनानंतर ‘व्हिसेरा’ राखून ठेवण्यात आला आहे. भद्रकाली पोलिसांच्या हद्दीत असलेल्या एका लॉजमधील खोलीत शनिवारी (दि. ३१) रात्री उशिरा इरफानचा मृतदेह आढळला.

रविवारी (दि. १) सकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयात विच्छेदन करण्यात आले. त्यावेळी इरफानच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होत नसल्याने ‘व्हिसेरा’ राखून ठेवण्यात आला. शनिवारी सायंकाळी उशिरा तो परराज्यातून नाशिकमध्ये परतला होता. भद्रकाली हद्दीत एका लॉजमध्ये मुक्कामासाठी गेल्यावर हा प्रकार घडला.

अतिनशेत त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. भद्रकाली पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद असून, तपास सुरू आहे. इरफान याच्या पश्चात वडील, पत्नी व दोन मुलगे असा परिवार आहे. त्याचे वडील नाशिक पोलिस दलातून निवृत्त झालेले असून, त्याचे सख्खे व चुलतभाऊ शहर पोलिस दलात कार्यरत आहेत.

तोतया पोलिसाकडून पाच लाखांची खंडणी

दुसरीकडे, आपण पोलिस अधिकारी असल्याचे भासवून खोट्या गुन्ह्याची धमकी देऊन पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या तोतयाविरुद्ध अहिल्यानगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका व्यावसायिकाला धमकावून खंडणीची मागणी केल्याप्रकरणी ज्या मोबाइलवरून धमकी येत होती, तो मोबाइलधारक आणि साथीदारांविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावेडीतील व्यावयासिक विनीत नानासाहेब जाधव (वय ३८, रा. सावेडी, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे.

जखमी कॉन्स्टेबलचा तेलंगणामध्ये मृत्यू

दरम्यान, तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यात गांजा तस्करांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या २३ वर्षीय महिला उत्पादन शुल्क कॉन्स्टेबलचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. जी. सौम्या असे मृत्यू झालेल्या कॉन्स्टेबलचे नाव आहे. २३ जानेवारी रोजी उत्पादन शुल्क पथकाने तस्करांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता कारने चिरडल्याने सौम्या यांना गंभीर दुखापत झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed