कल्याण
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यापासून बेपत्ता असलेल्या शिवसेना उबाठा पक्षाच्या नगरसेवकांच्या विरोधात पक्षाच्या जिल्हाप्रमुखांनी ‘नगरसेवक हरवले असल्या’ची तक्रार दाखल केली आहे. यानंतर आता शिवसैनिकांनी हे नगरसेवक हरवल्याचे पोस्टर जागोजागी पोस्टर्स लावत, ते कुठे दिसल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
इम्तियाज जलील यांनी केली किरीट सोमय्यांची नक्कल; शेजारी बसलेल्या सहर शेख यांना हसू आवरेना
पक्षाचे कल्याण पश्चिमेचे जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर यांनी आपल्या चारही नगरसेवकांना लवकरात लवकर परत पाठवा, अन्यथा नगरसेवक हरवल्याची तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला होता. तरीही हे नगरसेवक परतले नसल्याने अखेर कल्याण पूर्वेचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी कल्याण पूर्वेतील दोन नगरसेवक हरवल्याची तक्रार कोळसेवाडी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. त्यानंतर, ‘आपले दोन नगरसेवक हरविले आहेत, ते कोणाला दिसले, तर त्यांनी तातडीने शिवसैनिकांशी संपर्क साधावा,’ असे आवाहन करणारे पोस्टर्स आता शिवसैनिकांनी जागोजागी लावले आहेत.
कल्याणातील चार नगरसेवक बेपत्ता असताना केवळ दोन नगरसेवकांबाबतच तक्रार दाखल करण्यासह पोस्टर झळकवण्याची कारवाई केली जात आहे. कल्याण पश्चिमेकडून मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई का होत नाही, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. ठाकरे गटात असलेल्या दुहीचा फायदा महायुतीसह मनसेनेही घेतल्याचे या प्रकरणातून दिसत आहे.