• Tue. Jun 23rd, 2026

    लोनसाठी फोन करणाऱ्यांपासून सावधान!

    ByMH LIVE NEWS

    Jan 25, 2026
    लोनसाठी फोन करणाऱ्यांपासून सावधान!

    कोल्हापूर-प्रतिनिधी 

    कोल्हापुरात सध्या विविध प्रकारे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक होत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. पोलिसांकडून सतर्क राहण्याच्या सूचना देऊनही नागरिक या आमिषाला बळी पडत आहेत. अशीच एक घटना कोल्हापुरात समोर आली आहे. कर्जाचे आमिष दाखवत एका कंपनीने कोल्हापूरच्या प्रिंटिंग व्यवसायिकाला तब्बल 69 लाखांचा गंडा घातला आहे. कोल्हापूरच्या सदर बाजार परिसरातील प्रिंटिंग प्रेस मालक अक्षय दीपक ढाले (वय 30, रा. सदर बाजार हौसिंग सोसायटी) यांच्याकडून सरकारी स्टार्टअप कर्ज आणि निधी मिळवून देण्याच्या आमिषाने जयपूरस्थित अकोलाइट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 69 लाख 59 हजार 745 रुपयांची फसवणूक केली आहे.

    व्यवसाय विस्तारासाठी प्रिंटिंग मशिनरी खरेदीला 5 कोटी रुपयांचे कर्ज ढाले यांना हवे होते. या गरजेचा गैरफायदा घेत कंपनीने चार महिन्यांत विविध कारणास्तव रक्कम उकळली. या प्रकरणी ढाले यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कंपनीच्या नऊ संशयितांवर फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.

    व्यवसाय वाढीसाठी कर्ज शोधताना जाळ्यात अडकले

    ढाले यांचा सदर बाजार परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून प्रिंटिंग प्रेस व्यवसाय चालू आहे. मशिनरी अपग्रेड आणि विस्तारासाठी मोठ्या रकमेचे कर्ज आवश्यक होते. अनेक बँका आणि वित्तसंस्थांशी संपर्क साधला असला तरी सिबिल स्कोअर चांगला असल्यानेही प्रक्रिया रखडली होती. यावेळी 16 जुलै 2025 रोजी कंपनीचे प्रतिनिधी सुभाष मंडल यांचा फोन ढाले यांना आला होता. स्टार्टअप्सना सरकारी इन्क्युबेशन सेंटर्समार्फत कमी व्याजदराचे कर्ज आणि निधी मिळवून देण्याची कन्सल्टन्सी सेवा असल्याचे मंडल यांनी सांगितले. विश्वास संपादन करून ढाले यांची कागदपत्रे, बँक तपशील आणि सिबिल अहवाल ऑनलाइन घेतला.

    अनेक कारणांनी रक्कम केली वसूल

    सुरुवातीला प्रोसेसिंग फी आणि जीएसटीसाठी 72 हजार रुपयांची निम्मी रक्कम भरण्यास सांगितली. त्यानंतर व्यवसायाची ओपीसी (वन पर्सन कंपनी) नोंदणी, व्हाट्सॲप ग्रीन टिक, कॉपीराइट प्रमाणपत्र, मेक इन इंडिया प्रमाणपत्र, इन्क्युबेशन पॅनल सदस्यांसाठी रक्कम अशा विविध कारणांनी 9 डिसेंबर 2025 पर्यंत एकूण रक्कम ट्रान्सफर केली. ढाले यांनी मित्र, नातेवाईक आणि स्वकमाईच्या 18 खात्यांचा वापर करून कंपनीच्या खात्यात पैसे पाठवले. कंपनीच्या रोशनी (मॅनेजर) आणि श्वेतांक सोनी यांनी फाईल मंजूर होण्याचे सतत आश्वासन ढाले यांना दिले.

    कर्ज मिळत नसल्याने पैसे परत करण्याची मागणी केली असता संशयितांनी टाळाटाळ केली. निराश झालेल्या ढाले यांनी पोलीस आयुक्त योगेशकुमार गुप्ता यांच्याकडे तक्रार करून विशेष निर्देश मिळवले. पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पीआय हणमंत कांकडगी तपास करीत असून, जयपूर पोलिसांशी समन्वय साधला जात आहे.

    जयपुर स्थित कंपनीकडून फसवणूक

    गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये श्वेतांक सोनी, रुक्साना उमरदीन, सुभाष मंडल, रोशनी, अरोरा, पीयूष, अजय त्रिपाठी, यश ठाकूर आणि लीगल असिस्टंट यांचा समावेश आहे. 2021 मध्ये जयपूर येथे नोंदणीकृत (CIN: U80903RJ2021PTC074781) ही कंपनी स्टार्टअप सल्लागार म्हणून कार्यरत असली तरी सोशल मीडियावर इतर फसवणुकीच्या तक्रारी आहेत. स्टार्टअप्सकडून प्रकल्प फी घेऊन काम न करणे अशा घटना नोंदवल्या गेल्या आहेत.
    शाहूपुरी पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत. कंपनीच्या बँक खात्यांची चौकशी सुरू आहे. तर व्यवसायिक, स्टार्टअप्सना अशा कन्सल्टन्सी सेवांबाबत सावधान राहण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. ढाले यांच्या प्रकरणाने कोल्हापूर शहरात सतर्कता वाढली असून, अशा फसवणुकी रोखण्यासाठी कटिबद्ध असल्याचे पोलिसांनी सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *