शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सर्वात मोठं भाकीत केलं आहे. पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे धनुष्यबाण चिन्ह राहणार नाही, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाईल, असं भाकीत संजय राऊत यांनी केलं आहे. संजय राऊत यांनी ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत याबाबतचं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हावर निवडणूक आयोगाने जो निकाल दिलाय, तसेच आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात खटला सुरु आहे. या प्रकरणाला सातत्याने तारीख पे तारीख मिळताना दिसत आहेत. पुढच्या महिन्यात कदाचित यावर अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे. पण त्याआधीच संजय राऊतांनी मोठा दावा केलाय.”एकनाथ शिंदे यांचा पक्ष पुढील निवडणुकीनंतर राहणार नाही. लोकसभा निवडणूक असेल किंवा विधानसभा निवडणूक असेल, एकनाथ शिंदे यांच्याकडे धनुष्यबाण चिन्ह नसणार. एकनाथ शिंदे यांनी जरी सरन्यायाधीशांना पुष्पगुच्छ दिलं असलं तरी भारतीय संविधान जे सांगितलं, संविधानातील 10 परिशिष्ट जे सांगितलं त्यानुसार कारवाई होणार. त्यामुळे ते तारखांवर तारखा देत आहेत. त्यांची निर्णय देण्याची हिंमत नाही. त्यानुसार धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाईल आणि एकनाथ शिंदे यांना जी कंपनी चालवायला दिली आहे त्याचं शटर डाऊन होईल”, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे.निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह सोपवलं होतं. तर सुप्रीम कोर्टाने आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्षांना घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी घेतली. या सुनावणीत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला दिलासा मिळाला होता. या दोन्ही निकालांच्या विरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात गेला आहे. लवकरच या प्रकरणात अंतिम सुनावणी होणार आहे.
संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
दरम्यान, संजय राऊत यांनी या मुलाखतीत भाजपवर सडकून टीका केली. “माझ्यासारख्या माणसाच्या हातात या राज्याची किंवा देशातील विशिष्ट खात्याची सत्ता आली तर भाजपचे मी 15 तुकडे करुन टाकेन. मी मागेही बोललो आहे. ते तुकडे कुठे गेले ते त्यांना कळणार नाही. ईडी, सीबीआय, पोलीस यांच्या जोरावर सगळं सुरु आहे. भाजपचं पूर्ण काँग्रेस झालेलं आहे. स्वत:चं कुठे काय आहे? आमचे लोक त्यांच्याकडे आहेत. हातात सत्ता असेल आणि सत्ता अशाप्रकारे वापरली जाणार असेल तर या देशात आणि जगात काहीही घडू शकतो. ट्रम्प बघाना वेडा झाला. तसे ट्रम्पचे बाप इथे बसले आहेत”, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली.