• Fri. Jul 3rd, 2026

    अवघ्या 6 जागा जिंकूनही चंद्रपुरात ठाकरेंचाच महापौर बसणार? 10 नगरसेवक मुंबईला रवाना, पडद्यामागे मोठ्या घडामोडी

    ByMH LIVE NEWS

    Jan 25, 2026
    अवघ्या 6 जागा जिंकूनही चंद्रपुरात ठाकरेंचाच महापौर बसणार? 10 नगरसेवक मुंबईला रवाना, पडद्यामागे मोठ्या घडामोडी
    चंद्रपूर 
    चंद्रपुरातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 नगरसेवक, वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक आणि 2 अपक्ष नगरसेवक असे एकूण 10 नगरसेवक मुंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत. या 10 नगरसेवकांनी आधी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. त्यानंतर सर्व 10 नगरसेवक मुंबईच्या दिशेला रवाना झाल्याची माहिती आहे. हे सर्व नगरसेवक मुंबईत येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. या घडामोडींमुळे काँग्रेसची चिंता वाढणार आहे. कारण सर्व काही जुळून आलं तर चंद्रपूरमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही विरोधी बाकावर बसण्याची वेळ काँग्रेसवर येऊ शकते.चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसला 27 जागांवर यश आलं होतं काँग्रेसला बहुमतासाठी केवळ 7 जागांची आवश्यकता होती. पण निवडणुकीच्या निकालापासून काँग्रेसमध्येच अंतर्गत कलह सुरु असलेला बघायला मिळाला. चंद्रपुरात भाजपला 24 जागांवर यश मिळालं आहे. तर ठाकरे गटाला 6 आणि इतर 9 उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे ठाकरे गटाची भूमिका या निवडणुकीत गेमचेंजर ठरताना दिसत आहे. ठाकरे गटाने भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांना महापौर पदाची अट ठेवली आहे. सत्ता स्थापन करायची असेल तर आपल्याला महापौर पद द्यावं, अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे.

    राज्यात शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस हे महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत. त्यामुळे ठाकरे गटाने आधी काँग्रेसला महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदाची ऑफर दिली होती. चंद्रपुरात सत्ता स्थापन करायची असेल तर महापौर पद आपल्याला मिळावे, अशी भूमिका ठाकरे गटाची होती. पण काँग्रेसकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने ठाकरे गटाने वंचित आणि दोन अपक्षांना सोबत घेत भाजपशी बोलणी सुरु केल्याची चर्चा आहे.

    ठाकरे गट, वंचित आणि दोन अपक्षांची भाजपसोबत खरंच चंद्रपुरात मैत्री झाली तर बहुमताचा 34 हा मॅझिक फिगर आकडा गाठण्यात भाजपला यश मिळणार आहे. त्यामुळे काँग्रेसला सर्वाधिक जागा जिंकूनही सत्तेबाहेर बसावं लागणार आहे. विशेष म्हणजे काँग्रेसमध्ये आपापसात लढणाऱ्या नेत्यांनादेखील ही मोठी चपराक असणार आहे. 10 नगसेवक मुंबईत आल्यानंतर काय-काय घडामोडी घडतात? ते पाहणं आता महत्त्वाचं आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed