• Fri. Jul 3rd, 2026
    Women Farmer Bill: विनासातबाराही शेतकरी प्रमाणपत्र; महिला शेतकरी विधेयकाला विधानसभेत एकमताने मंजुरी, तरतुदी काय?

    मुंबई : शेती आणि संलग्न कार्यात सहभागी असलेल्या महिलांना शेतकरी म्हणून मान्यता देणारे ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक ’ गुरुवारी विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. शेतीच नव्हे तर पशुपालन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन तसेच इतर शेती संलग्न व्यवसायात असलेल्या महिलांना या विधेयकामुळे शेतकरी दर्जा मिळणार आहे. महिलेच्या नावावर सातबारा नसला तरी त्यांना शेतकरी प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाहीर केले.

    महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक बुधवारी विधानसभेत मंजुरीसाठी सादर करण्यात आले होते. गुरुवारी कृषिमंत्र्यांनी विधेयकाचा हेतू आणि उद्देश स्पष्ट केला. ‘शेतजमीन महिलांच्या नावावर करणे हा विधेयकाचा उद्देश नाही. तर कृषी क्षेत्र अथवा शेतीशी संबंधित क्षेत्रात ज्या महिला काम करतात त्यांना स्वत:ची शेतकरी म्हणून ओळख मिळावी’, हा उद्देश असल्याचे भरणे यांनी यावेळी सांगितले.

    RTI Act : अण्णा हजारेंमुळे सरकारची धावपळ, मुख्यमंत्र्यांची तातडीची एंट्री; अखेर आरटीआयवर काय घडलं?
    १५ ते २० टक्क्यांपेक्षा कमी महिलांची नावे सातबारावर आहेत. त्यामुळे सातबारावर ज्यांची नावे नाहीत अशांनाही आता शेतकरी म्हणून दर्जा आणि अधिकार या विधेयकामुळे मिळेल. याशिवाय महिलांना राज्याच्या आणि केंद्राच्या कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मिळणार असल्याचे भरणे यांनी सांगितले. तत्पूर्वी, या विधेयकाचे स्वागत करताना सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी काही सूचना केल्या. काही सदस्यांनी या विधेयकांचा गैरफायदा घेतला जाईल, अशी भीती व्यक्त केली. तर काही सदस्यांनी थेट महिलांच्या नावावर ५० टक्के जमीन करण्याची मागणी केली.

    बाहेरील राज्यातील महिला शेतमजूर अथवा प्रक्रिया उद्योगात काम करणाऱ्या महिलांना शेतकरी दर्जा मिळाला तर त्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो, याकडे शिवसेना उबाठा पक्षाचे कैलास पाटील यांनी लक्ष वेधले. मात्र, राज्याबाहेरील महिलांना शेतकरी प्रमाणपत्र दिले जाणार नसल्याचे कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले. चर्चेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, महिला आणि बालविकासमंत्री अदिती तटकरे, आदित्य ठाकरेंनी भाग घेतला.
    Maharashtra TimesMSRTC : एसटी महामंडळाकडून एका झटक्यात थेट 12 अधिकारी निलंबित, कोणत्या विभागांत कारवाई?
    अर्धा एकर जमीन कशी देणार : भास्कर जाधव
    शेतकरी होण्यासाठी किमान अर्धा एकर जमीन असली पाहिजे, असा कायदा आहे. महिलांच्या नावावर अर्धा एकर शेती नसेल तर त्यांना शेतकरी म्हणून मान्यता मिळत नाही. ज्या महिलांना शेतकरी दर्जा देणार आहात, त्यांना अर्धा एकर जमीन कशी देणार , असा मुद्दा शिवसेना ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी उपस्थित केला.

    पन्नास टक्के जमीन महिलांच्या नावे करा
    चर्चेत सहभागी होताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी शेतकरी पतीच्या नावावरील ५० टक्के शेतजमीन महिलांच्या नावे करण्याची मागणी केली. विधेयकाच्या माध्यमातून महिलांची फसवणूक करू नका, सातबारावर महिलांची नावे नोंद करा. कर्ज देताना महिला शेतकऱ्यांना विनातारण कर्ज देणार आहात का, याचा खुलासा करा असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. लाडकी बहीण योजनेतून ८० लाख महिला बाहेर काढल्या. त्यांना खूश करण्यासाठी हे विधेयक आणले नाही ना, असा संशयही त्यांनी व्यक्त केला.

    Maharashtra TimesSachin Ahir : फडणवीसांच्या मध्यस्थीने अहिरांचं पक्षांतर? उपसभापतीपदासाठी शिंदेंचंही मन वळवलं, ऑपरेशन टायगरमागे दोन उद्योगपती
    तरतुदी काय ?
    -ग्रामपंचायत आणि नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत मान्यता मिळाल्यानंतर महिलांना सहाय्यक कृषी अधिकाऱ्याकडून शेतकरी म्हणून प्रमाणपत्र मिळेल
    -विविध सरकारी योजनेतून महिला शेतकऱ्यांना वित्त पुरवठा उपलब्ध करून देण्याबरोबर त्यांच्यासाठी राज्य महिला शेतकरी निधीची स्थापना केली जाणार आहे
    -कृषीविषयक अर्थसहाय्य याशिवाय खते, बियाणे, पीक विमा, कृषी उत्पादन बाजारपेठेत पोहचवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील
    -शेतकरी सक्षमीकरण परिषद या विधेयकानुसार महिला शेतकरी सक्षमीकरण परिषदेची स्थापना करण्यात येणार असून मुख्यमंत्री त्याचे अध्यक्ष असतील
    -उपमुख्यमंत्री, कृषी, महसूल, महिला व बालविकास मंत्र्यांसह विविध विभागाचे मंत्री त्याचे सदस्य असतील. तर कृषी विभागाचे सचिव या परिषदेचे सदस्य सचिव असतील. तसेच मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य संनियंत्रण समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीचे सदस्य सचिव कृषी आयुक्त असतील.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed