• Fri. Jul 3rd, 2026
    Palghar Rain: दुर्दैवी! घरात साचलेलं पाणी बाहेर काढताना अचानक भिंत कोसळली, 47 वर्षीय महिलेचा करुण अंत

    Palghar Rain: राज्यात सर्वत्र तीन दिवसांपासून संततधार सुरु आहे. पालघरमध्ये घराची भिंत अंगावर कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. एक तरुण नदीपात्रात बुडाला, तर एक जण बेपत्ता आहे.

    पालघर पाऊस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, पालघर : जिल्ह्यात गुरुवारी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून, सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यातच सलग तीन दिवस सुरू असलेल्या संततधारेमुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

    पालघर नगरपरिषद हद्दीतील जुना पालघर परिसरात घरात शिरलेले पाणी बाहेर काढत असताना घराची भिंत अंगावर कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. जखमी महिलेला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तर पालघर मनोर रस्त्यावरील सज्जन पाडा या गावातील चंदन वरठा (वय २८) हा तरुण बुधवारी रात्री मासवण येथे सूर्या नदीच्या पात्रात मासेमारीसाठी गेला होता. तो नदीपात्रात बुडाला. तर डहाणू तालुक्यातील पेठ (केदारपाडा) येथील विठ्ठल केदार (५५) हे बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास सूर्या नदीवर मासेमारी करण्यासाठी गेले होते. परंतु अद्यापपर्यंत घरी परतलेले नाहीत. नदीच्या आजूबाजूच्या परिसरात शोध सुरू आहे.

    Maharashtra TimesWomen Farmer Bill: विनासातबाराही शेतकरी प्रमाणपत्र; महिला शेतकरी विधेयकाला विधानसभेत एकमताने मंजुरी, तरतुदी काय?
    दरम्यान, तालुक्यातील पूर्व भागातील धुकटण गावातही एका घराची भिंत कोसळून मोठे नुकसान झाले. जुना पालघर परिसरात पावसाचे पाणी अनेक घरांत शिरले होते. शब्बीर सय्यद हे कामानिमित्त बोईसर येथे गेले असताना, त्यांच्या पत्नी राबिया यांनी घरात पाणी शिरल्याची माहिती देत त्यांना तातडीने घरी बोलावले. दोघेही घरातील पाणी बाहेर काढत असतानाच जुन्या घराची भिंत त्यांच्या अंगावर कोसळली. या दुर्घटनेत राबिया शब्बीर सय्यद (वय ४७) गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने पालघर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. शब्बीर सय्यद हेही या दुर्घटनेत जखमी झाले आहेत.

    पालघर तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील धुकटण (काकरीपाडा) येथे वादळी पावसामुळे रात्री उशिरा नारायण केवश काकरा यांचे घर कोसळून नुकसान झाले. दरम्यान, जाणता राजा सामाजिक सेवा संस्था, धुकटण-पालघर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पालघर येथून ताडपत्री आणून बाधित कुटुंबाला तात्पुरता आसरा उपलब्ध करून दिला.

    Maharashtra TimesAshadhi Wari : वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारने 2.80 कोटींचा निधी मंजूर केला; दिंड्यांना किती अनुदान मिळणार?
    सूर्या कालव्याचे काँक्रीटीकरण गेले वाहून
    डहाणू : तालुक्यात मंगळवारी रात्री झालेल्या पावसात सूर्या प्रकल्पाच्या उजव्या तीरावरील सारणी येथील कालव्याचे नव्याने केलेले काँक्रीटीकरण वाहून गेल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. कालव्याच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला होता. कामादरम्यान निकृष्ट साहित्य वापरल्याच्या तक्रारी यापूर्वीही झाल्या होत्या. उपअभियंता संदीप सरगर यांनी पावसाच्या प्रवाहामुळे कालव्याचा काही भाग खचल्याचे सांगत पाऊस थांबल्यानंतर तातडीने दुरुस्ती केली जाईल, असे स्पष्ट केले. दरम्यान, कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी प्रहार संघटनेचे सचिव जितेश पाचलकर यांनी केली आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा