कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रचंड घडामोडी सुरु आहेत. ठाकरे गटाचे 4 नगरसेवक आज गटनेता बैठकीच्या निवडीला गैरहजर राहिले. पक्षाकडून आता अधिकृतपणे आकडा जाहीर करण्यात आला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रदिप भणगे, ठाणे : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीनंतरही राजकीय घडामोडी संपण्याचं नाव घेताना दिसत नाहीत. इथे भाजपला 50 तर शिवसेनेला 53 जागांवर यश मिळालं आहे. शिवसेना ठाकरे गटाला 11 आणि मनसेला 5 जागांवर यश मिळालं आहे. एकही पक्ष 62 हा बहुमताचा आकडा गाठू शकलेला नाही. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत 62 हा आकडा गाठण्यासाठी, विशेषत: महापौर आपला व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामुळेच कल्याण डोंबिवलीत फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर निवडून आलेले नगरसेवक मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे अजूनही नॉट रिचेबल आहेत. तर आणखी दोन नगरसेवक हे गटनेता निवडीच्या बैठकीला गैरहजर राहीले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून गटनेता निवडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचं सर्व नगरसेवकांना निमंत्रण देण्यात आलं होतं. 11 पैकी 9 नगरसेवकांशी संपर्क करुन त्यांना बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं होतं. तर 2 नगरसेवक हे नॉट रिचेबल असल्याने त्यांच्या घरातील सदस्यांच्या हातात याबाबतची नोटीस देण्यात आली होती. पण तरीही ते बैठकीला आले नाहीत. ते दोन्ही नगरसेवक अद्यापही नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे.
7 नगरसेवकांचा गट स्थापन
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या 11 पैकी 7 नगरसेवकांनी गटनेता निवडीच्या बैठकीला हजेरी लावली. यावेळी सात जणांचा गट स्थापन करण्यात आला. कोकण मंडळात नोंदणी करण्यात आली. उमेश बोरगावकर यांची गटनेता पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे शहरप्रमुख बाळा परब यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. जे नगरसेवक गैरहजर होते त्यांच्यावर आता अपात्रतेची कारवाई होईल, असं त्यांनी सांगितलं आहे.
बाळा परब नेमकं काय म्हणाले?
“गेल्या चार-पाच दिवसांत अतिशय धावपळ सुरु होती. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 11 नगरसेवक निवडून आले आहेत. ते निवडून आल्यानंतर पुढची जी प्रक्रिया असते ती पूर्ण झालेली आहे. त्या प्रक्रियेप्रमाणे शिवसेनेचा गट स्थापन झाला आहे. गटनेतेपदी उमेश बोरगावकर यांची निवड झाली आहे. पक्ष प्रतोद म्हणून शंकेश भोईर यांची निवड झाली आहे”, अशी माहिती बाळा परब यांनी दिली.
“जे संपर्कात आहेत त्यामध्ये राहुल कोट आणि स्वप्नाली केणे यांच्याशी संपर्क साधूनही ते गटनेते पदाच्या निवडीच्या बैठकीला आले नाहीत. तर दुसरे मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे नॉट रिचेबल आहेत. त्यांचा संपर्क होत नाहीत. ते लवकरच संपर्कात येतील. ते संपर्कात आल्यानंतर पक्षाकडून त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात येईल”, अशी प्रतिक्रिया शहरप्रमुख बाळा परब यांनी दिली.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा