रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत बुधवारी संपत असल्याने अलिबागमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. शेवटच्या दिवसाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची धावपळ वाढली असून, मंगळवारी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली.
शेवटच्या दिवशी होणारी गर्दी आणि गोंधळ टाळण्यासाठी अनेक उमेदवारांनी मंगळवारचाच मुहूर्त साधत आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली. तरीही बुधवारी शेवटचा दिवस असल्याने आणखी मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक इच्छुक उमेदवारांची कागदपत्रांची पूर्तता अद्याप अपूर्ण असून काहींना पक्षांचे ए व बी फॉर्म अद्याप प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे शेवटच्या क्षणी कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी उमेदवारांची लगबग सुरू आहे.
उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची वेळ सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली होती. मात्र एकाच वेळी मोठ्या संख्येने उमेदवार, त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते दाखल झाल्याने निवडणूक यंत्रणांची तारांबळ उडाली. परिस्थिती लक्षात घेता, अधिकाऱ्यांनी पावणे तीन वाजता टोकन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याचा निर्णय घेतला. परिणामी संध्याकाळी उशिरापर्यंत नामांकन प्रक्रिया सुरू होती.
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! e-KYC बद्दल मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून मोठी अपडेट
अलिबागमध्ये विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी पूर्ण केली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून रसिका केणी, अनंत गोंधळी, शेकापकडून प्रिया ढवळे, अभिषेक पाटील, सानिका घरत, प्रफुल्ल पाटील, भाजपकडून प्रियदर्शनी पाटील, संजय पाटील, तर शिवसेना ठाकरे गटाकडून सुरेंद्र म्हात्रे यांनी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसचे राजा ठाकूर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीधर भोपी, अमित नाईक आणि गोरेगाव मतदारसंघातून भारत गोरेगावकर यांनीही आपले नामनिर्देशनपत्र सादर केले.
KDMC Election Result : सस्पेन्स अजून संपलेलाच नाही, ठाकरे गटाचे 4 नगरसेवक गैरहजर, पक्षाकडून अधिकृत आकडा जाहीर
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस असल्याने अलिबागमध्ये आणखी राजकीय गडबड आणि उमेदवारांची गर्दी होण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यातील निवडणूक रणधुमाळी आता शिगेला पोहोचत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
