• Thu. Mar 19th, 2026
    E-Bus News : ई-बस ‘ब्रेकडाऊनच’; मोठा गाजावाजा पण बस पुरवठा नाही, चार्जिंग स्टेशनचं कामही रखडलं; एसटी महामंडळाचं निराशाजनक चित्र

    E-Bus Project ST Corporations : एसटी महामंडळाच्या ई-बस प्रकल्पात बस पुरवठा होत नसून चार्जिंग स्टेशनचं कामही रखडलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सतत वेळ मर्यादा गेल्यानंतरही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या ई-बस प्रकल्पाचा मोठा गाजावाजा करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात याबाबतचे चित्र निराशाजनक आहे. 31 डिसेंबरपर्यंत अपेक्षित एक हजार गाड्यांपैकी 25 टक्के गाड्या ताफ्यात दाखल झालेल्या नाहीत. पुरवठादाराकडून बस पुरवण्यासह चार्जिंग स्टेशनचे कामही रखडले आहे. विशेष म्हणजे, वारंवार कालमर्यादा ओलांडलेल्या पुरवठादारांवर ठोस कारवाई करण्यास एसटी महामंडळ धजावत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

    केंद्रीय अनुदानावर एसटी महामंडळाच्या ताफ्यातील 30 टक्के बसगाड्या विजेवर धावणाऱ्या करण्यासाठी पाच हजार 150 ई-बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. 13 फेब्रुवारी 2024 पासून या ताफ्यात येण्यास सुरुवात झाली. वर्षभरानंतर केवळ 222 गाड्या दिल्याने महामंडळाने पुरवठादाराला नाममात्र चार कोटी रुपयांचा दंड ठोठावला. एप्रिल 2025 पासून दरमहा 200 गाड्या देण्याचे आश्वासन कंत्राटदाराने महामंडळाला दिले खरे, मात्र डिसेंबरअखेर केवळ 515 गाड्यांची भर पडली.
    Maharashtra TimesPune News : ‘एस’ आकाराचं धोकादायक घाट वळण संपणार, पुणे-सातारा मार्गावर नवे दुहेरी बोगदे, 45 मिनिटांचा प्रवास 7 मिनिटांत
    31 डिसेंबर 2025 अखेर 737 बसगाड्या एसटी ताफ्यात दाखल झाल्या आहेत. यात नऊ मीटरच्या 260 आणि 12 मीटरच्या 477 अशा गाड्यांचा समावेश आहे. बसगाड्यांच्या तुटवड्यामुळे सुरू असलेल्या मार्गांसह नव्या मार्गांवरदेखील गाड्या सुरू करणे शक्य होत नाही. परिणामी, एसटी प्रवासी अन्य प्रवासी वाहनांकडे वळत आहेत. एसटीच्या वाहन स्थितीनुसार 31 डिसेंबरपर्यंत एसटी ताफ्यात 15 हजार 221 बसगाड्या आहेत. यातील निम्म्याहून अधिक आयुर्मान पूर्ण झालेल्या गाड्यांचा समावेश आहे. यामुळे मार्गात बंद पडणे, नादुरुस्त असणे, गाड्यांची स्थिती बिकट असणे अशा तक्रारी वाढत आहेत.

    ST तिकीट दरवाढ वरून विरोधक आक्रमक; अजितदादांसोबतच्या बैठकीनंतर मंत्री सरनाईकांची प्रतिक्रिया

    राज्यातील 171 ठिकाणी उच्च क्षमतेचे चार्जिंग स्टेशन उभारणीचे कामदेखील याच बस-पुरवठादाराकडे आहे. डिसेंबरअखेर केवळ 31 ठिकाणी अशी स्टेशन कार्यान्वित करण्यात आली असून अन्य 15 ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम सुरू आहे, असे एसटीतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केकरिश्मा भुर्के, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. मागील ३ वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, त्यानंतर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.… आणखी वाचा