पालघरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. वसईच्या किनाऱ्यापासून काही किमी अंतरावर समुद्रात पाण्याच्या प्रवाहाचे गोल रिंगण आढळले आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पालघर : वसई किनाऱ्यापासून काही किलोमीटर अंतरावर समुद्रात काहीतरी गूढ घडत असल्याचे संकेत मिळत आहेत. समुद्राच्या पोटात नेमकं काय सुरु आहे? हे आपल्याला सहज समजू शकत नाही. कारण जितका तो अथांग आहे, खोल आहे, तितकाच तो गूढही आहे. या समुद्रात अनेक जीव सहवास करतात. तसेच अनेक जण बोटीतून समुद्राच्या या किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यावर जातात. अनेक कोळीबांधव मासेमारी करण्यासाठी समुद्रात जात असतात. ते निर्भिडपणे दूपर्यंत जात खोल समुद्रातून मासेमारी करतात. पण या मासेमारी बांधवांची चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. वसईच्या समुद्रात काहीतरी गूढ हालचाली होताना दिसत आहेत. संबंधित घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे समुद्रात नेमकं काय घडत आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वसई, विरार भागातून मोठ्या संख्येने बोटी मासेमारीसाठी खोल समुद्रात जात असतात. नुकताच वसईच्या पाचूबंदर येथील एक मासेमारी नौका मासेमारीसाठी गेली होती. यावेळी या बोटीतील सदस्यांना खोल समुद्रात पाण्याच्या प्रवाहाचे मोठे रिंगण तयार झाल्याचे दिसून आले होते. या रिंगणाचा व्हिडीओही समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे. या घडलेल्या प्रकारानंतर यंत्रणा सजग झाल्या आहेत. तर मच्छिमार बांधवामध्ये चिंतेचे वातावरण आहे. याची माहिती मत्स्य अधिकाऱ्यांना दिल्यानंतर याबाबत तटरक्षक दल आणि नौदलाला कळवण्यात आले आहे.
दरम्यान, पालघर जिल्ह्यात सातत्याने भूकंपाचे हादरे बसतात. पालघर हे भूकंपाचे क्षेत्र असल्याचं नेहमी बोलले जाते. कारण या ठिकाणी दरवर्षी 200 पेक्षा जास्त सौम्य भूकंपाचे धक्के येत असतात. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असतं. या दरम्यान, समुद्रात जो वर्तुळ बघायला मिळाला आहे त्याचा संबंध काही जणांकडून थेट पाण्याखालील ज्वालामुखी क्रियाकलापांशी असू शकतो, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
सागरी जीव बचाव पथकातील सदस्य जनार्दन मेहरे यांनी याबाबत विनंती केली आहे. त्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अधिकाऱ्यांना या प्रकरणी तात्काळ चौकशी करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणी चौकशीनंतर काय माहिती समोर येते ते पाहणं महत्त्वाचं आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा