Nashik Voting : नाशिकमध्ये बनावट अधिकाऱ्याला पैसे वाटप करताना पकडल्याचा प्रकार उघडकीस आला. तर दुसरीकडे दुपारनंतर अचानक मतदार मतदानासाठी गर्दी करताना दिसले. पैसे वाटपावरुन शहरात तणाव निर्माण झाला होता.
गुरुवारी सकाळी मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दुपारपर्यंत काही मतदान केंद्रांकडे मतदार फिरकले नाहीत. दुपारी दोन वाजेनंतर मतदारांची पावले मतदान केंद्राकडे वळली. परंतु, सर्वपक्षीय उमेदवारांसह अपक्ष उमेदवार आपल्या घराच्या जवळील मतदान केंद्रांवर मतदारांच्या स्वागताला सहकुटुंब हजर होते. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत येण्याजण्याची व्यवस्था उमेदवारांकडून करण्यात आल्याचे दिसून आले. नाशिकरोड विभागात देवळाली गाव, विहितगाव आणि जेलरोड भागातील काही मतदान केंद्रांवर राजकीय तणावाचे वातावरण दिसून आले. नाशिकरोड विभागात 4 जागांवर 10 माजी नगरसेवक आमनेसामने होते. तर, विभागातील 6 प्रभागांत 26 माजी नगरसेवकांचे राजकीय भवितव्य ‘ईव्हीएम’ मध्ये बंद झाले.
Maharashtra Municipal Election Result इथे वाचा : https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-municipal-corporation-election-result-2026-live-updates-bmc-bjp-shivsena-ubt-raj-uddhav-thackeray-devendra-fadnavis-seats-in-marathi/liveblog/126555543.cms
देवळालीगावात तणाव
मतदानाच्या आदल्या रात्री देवळालीगावात पैसे वाटपाच्या संशयावरून राष्ट्रवादी आणि उबाठाच्या कार्यकत्यांत तणाव निर्माण झाला होता. उबाठाचे उमेदवार आणि कार्यकर्ते पैसे वाटप करण्यासाठी आल्याच्या संशयातून देवळाली गावात रात्री राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठाण मांडून रात्र जागून काढली. त्यामुळे दोन्हीही गटाच्या उमेदवारांच्या कार्यकर्ते समोरासमोर आल्याने बाचाबाची होऊन तणाव निर्माण झाला होता. दोन गटांत धक्काबुक्की झाल्याचेही समजते.
संपर्क कार्यालयाची झाडाझडती
प्रभाग 19 मधील भाजपचे उमेदवार योगेश ताजनपुरे यांच्या सिन्नरफाटा येथील एकलहरे रोडवरील कार्यालयावर निवडणूक आयोगाच्या पथकाने धाड टाकून तपासणी केली. परंतु, निवडणूक आयोगाच्या पथकाला या कारवाईत काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही.
Nashik Election 2026: डावी की उजवी तर्जनी, सोयीने लावली मतदानाची निशाणी! निवडणूक कर्मचारी स्वतःच गोंधळात, मोबाइलवर Video पाहून कामकाज
पिंक बूथची उभारणी
निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार प्रत्येक विभागात एक पिंक बूथ उभारण्यात आले. नाशिकरोड विभागात शाळा क्रमांक 125 मधील प्रभाग क्रमांक 21 मधील मतदान केंद्र क्रमांक 20 खोली क्रमांक 2 येथे पिंक बूथ उभारण्यात आलेले होते. येथे गुलाबी फुग्यांनी सजावट केलेली होती. याशिवाय येथे मतदान केंद्राध्यक्षांसह इतर कर्मचारी म्हणून केवळ महिलांचीच नेमणूक होती.
पैसे वाटताना बनावट अधिकाऱ्यास पकडले
देवळाली गाव येथील प्रभाग 22 मधील मतदान केंद्र क्रमांक 4 वर सिद्धांत विलास पाटील (रा. जारगाव, ता. पाचोरा) यास मतदारांना पैसे वाटप करीत असल्याच्या संशयावरून शिवसेना उबाठाच्या कार्यकत्यांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. सदर व्यक्तीला एका मंत्र्याने पैसे वाटण्यासाठी पाठविल्याचा आरोपही कार्यकत्यांनी केला. या संशयिताकडे मंत्रालयीन विभागाचे ओळखपत्र आणि पैसे मिळून आले. परंतु, ओळखपत्र बनावट असल्याचा दावा पोलिसांनी केला. सदर व्यक्ती भाजपच्या उमेदवारांच्या वतीने पैसे वाटपासाठी आल्याचा आरोप करण्यात आला. संशयिताने आपण नाशिकरोड पोलिस ठाण्यात वैयक्तिक कामासाठी आल्याचा दावा केला.
बोगस मतदानासाठी गाडी भरुन महिला आणल्या, मतदान केंद्रावरच राडा; नेमकं काय घडलं?
पैसेवाटपामुळे जेलरोडला खोळंबली वाहतूक
प्रभाग 17 मधील एका उमेदवाराने थाटलेल्या संपर्क कार्यालयाच्या मंडपात मतदान स्लिप वाटण्याच्या नावाखाली दुपारी पैसे वाटप सुरू असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. ‘आधार कार्ड दाखवा आणि पैसे घ्या’ असे चित्र येथे होते. याची खबर लागल्याने गर्दी इतकी वाढली की, पाचशेच्या नोटांची खिंचताण सुरू झाली. एका ठिकाणाहून पैसे घेऊन आलेल्या मतदारांबरोबरच तथाकथित मतदारांनीही रांग लावली. त्यामुळे या रस्त्यावर ट्रॅफिक जाम झाली. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मंडपात जाऊन फोटो काढू लागताच समर्थकांनी आक्षेप घेतला. काहीच घडत नसल्याचा दावा केला. गर्दी वाढू लागल्याने या समर्थकांनी शेवटी आपले दुकान आवरून पोबारा केला.
