मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज पुण्यात प्रचारसभा पार पडली. या प्रचारसभेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांना दोन्ही पवारांच्या एकत्र येण्याबाबतच्या प्रश्नावर मिश्किल प्रतिक्रिया दिली.
देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रचारसभा संपल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “पुणे शहराने नेहमीच भारतीय जनता पक्षाला साथ दिली आहे. त्यामुळेच आम्ही आमच्या प्रचारसभांची सुरुवात आणि सांगता पुण्यातून करतो. केवळ पुणेच नव्हे, तर मुंबई, नाशिक आणि नागपूरसारख्या मोठ्या शहरांमधील मतदारांनी भाजपलाच मतदान करण्याचा ठाम निश्चय केला आहे. विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी लोकांची ही मानसिकता बदलणार नाही”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये महायुती होणार नाही, हे मी आधीच स्पष्ट केले होते”, असे फडणवीस यांनी सांगितले. “मी शब्द पाळणारा माणूस आहे. आम्ही मैत्रीपूर्ण लढत देऊ आणि एकमेकांवर वैयक्तिक टीका करणार नाही, असे ठरले होते. मात्र, अजित पवारांनी हा शब्द पाळला नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. तरीही, निवडणुकीनंतर स्थानिक पातळीवर गरज पडल्यास विरोधकांना सोबत घेण्याबाबत विचार होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या बातम्यांवर फडणवीस म्हणाले की, “सध्या यावर बोलणे अकाली आहे. हिंदीत एक म्हण आहे- ‘कब बाप मरेगा और कब बैल बटेंगे’, तशीच काहीशी ही परिस्थिती आहे. अजून काही ठोस घडलेले नसताना एवढी चर्चा कशासाठी?” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, केवळ दोन महापालिकांमध्ये हे दोन्ही गट एकत्र लढत आहेत, परंतु राज्यातील इतर २७ महापालिकांमध्ये ते एकमेकांविरोधात उभे आहेत. त्यामुळे या ‘एकत्रीकरणाला’ फारसा अर्थ उरत नाही.
अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्यांबाबत विचारले असता, फडणवीस यांनी मिश्किलपणे सांगितले की, “जर ते आमच्या पक्षाच्या वरिष्ठांना भेटण्यासाठी दिल्लीला जात असतील, तर त्यात मला काहीच अडचण नाही. उलट, त्यांच्या प्रवासासाठी विमान आणि तिकीटाची व्यवस्थाही मी स्वतः आनंदाने करीन. जोपर्यंत ते आमच्या वरिष्ठांच्या संपर्कात आहेत, तोपर्यंत मी समाधानी आहे.”
