पुणे महापालिका निवडणुकीत सुरुवातीपासून ट्विस्ट आलेला बघायला मिळाला. भाजपला इथे 100 जागा जिंकायचं ध्येय आहे. पण उपमु्ख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय खेळीमुळे भाजपच्या गोटात धाकधूक वाढल्याची माहिती आहे. या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील भाजप नेतृत्वाची ‘शाळा’ घेतल्याची देखील आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
अजित पवार यांनी भाजपमधील काही बंडखोरांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी दिल्याने अनेक प्रभागांत भाजपची मते विभागली जाण्याची शक्यता आहे. या अनपेक्षित खेळीमुळे भाजपचे ‘मिशन १०० प्लस’ धोक्यात आल्याचे बोलले जात आहे. सर्वेक्षणाचे नकारात्मक अहवाल समोर आल्यानंतर फडणवीस यांनी या परिस्थितीची गंभीर दखल घेतली आहे.
BMC All Candidate List : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तुमच्या प्रभागात कोणाकोणात लढत? वाचा A टू Z यादी
देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री कात्रज येथील जाहीर सभेत अजित पवारांचे नाव न घेता त्यांच्या जुन्या कार्यपद्धतीवर टीका केली. मात्र, खरी राजकीय खलबते सभा संपल्यानंतर रंगली. विमानतळाकडे जाताना फडणवीस यांच्यासोबत खासदार मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील एकाच गाडीत होते. फडणवीस गाडीत बसल्यानंतर त्याचवेळी तेथे चंद्रकांत पाटील पोहचले. चंद्रकांत पाटील आल्यानंतर स्वतः फडणवीसांनी मुरलीधर मोहोळ यांना आवाज देण्यास सांगितले. हे आदेश येताच चंद्रकांत पाटलांनी मोठ्या आवाजात ‘अण्णा-अण्णा’ म्हणत आरोळी ठोकत घाईत मोहोळ यांना बोलावून घेतले.
Sangli News : ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या आईचा स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न, सांगलीत मोठी खळबळ
त्यानंतर विमानतळावर या तिन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड प्रदीर्घ चर्चा झाली. या बैठकीत फडणवीस यांनी पुण्यातील सर्व १६५ जागांचा आढावा घेतला. ज्या प्रभागांमध्ये भाजपची स्थिती कमकुवत आहे किंवा जिथे सर्वेक्षणाचे निकाल विरोधात गेले आहेत, तिथे तातडीने व्यूहरचना बदलण्याचे आदेश फडणवीसांनी दिले आहेत. “गाफील राहू नका आणि कोणत्याही परिस्थितीत विजयाचा आकडा गाठा,” अशा कडक शब्दांत त्यांनी स्थानिक नेतृत्वाची ‘शाळा’ घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
