Thane Municipal Corporation Election: ठाणे महापालिकेची निवडणूक १५ जानेवारीला होत आहे. १६ तारखेला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. या निवडणुकीत काय होणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
मयूर शिंदेनं गेल्या ८ दिवसांत ३ पक्ष बदलले आहेत. मयूर शिंदे २२ डिसेंबरपर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सक्रिय होता. पण शिंदेसेनेकडून निवडणुकीचं तिकीट मिळणार नसल्याचा अंदाज येताच मयूर शिंदेनं पक्ष बदलला. २३ डिसेंबरला त्यानं भाजपमध्ये प्रवेश केला. त्याच्या पक्षप्रवेशाला भाजपचे आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे उपस्थित होते. मयूर शिंदेला सावरकर नगर प्रभाग क्रमांक १४ मधून उमेदवारी हवी होती. पण भाजमधूनही संधी मिळणार नाही, याची जाणीव शिंदेला झाली आणि त्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अखेर अजित पवारांनी त्याला तिकीट दिलं. मयूर शिंदेनं अखेरच्या क्षणी उमेदवारी अर्ज दाखल केला.
गेल्या आठ दिवसांत मयूर शिंदे तीन पक्ष फिरला. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी कायमच चर्चेत राहिली. पण तरीही महायुतीमधील तिन्ही प्रमुख पक्षांनी त्याला आपलंसं केलं. त्यामुळे गुंड आवडे सर्वांना अशी चर्चा ठाण्यात सुरु झाली. सत्ताधाऱ्यांकडून गुंडांना, गुन्हेगारांना दिला जाणारा आश्रय हा मुद्दादेखील चर्चेत राहिला.
मयूर शिंदेवर अनेक गंभीर आरोप आहेत. हत्या, हत्येचा प्रयत्न, जबरदस्तीनं वसुली असे गुन्हे त्याच्यावर आहेत. मकोका अंतर्गत त्याच्यावर खटला चालला आहे. त्याच्यावर तडीपारीची कारवाईदेखील झालेली आहे. शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत आणि त्यांच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिल्यानं मयूर शिंदे चर्चेत आला होता. त्याला या प्रकरणात अटक झाली होती. मयूरनं २०१७ मध्ये शिवसेनेकडे तिकीट मागितलं होतं. त्यावेळी शिवसेना एकसंध होती. पण पक्षानं तेव्हा शिंदेला तिकीट नाकारलं. याच शिंदेसाठी भाजपनंदेखील पायघड्या घातल्या होत्या.
