Pune Election News: नेत्याच्या दोन्ही मुलांना पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाली असून एक मुलगा भारतीय जनता पक्षामध्ये निवडणूक लढवत आहे तर दुसरा राष्ट्रवादी मधून निवडणूक लढवत आहे.
यामध्येच पुण्यातील दोन उमेदवारांनी विशेष लक्ष वेधले आहे. याचं कारण म्हणजे हे दोन उमेदवार भाऊ असून ते वेगवेगळ्या पक्षातून निवडणूक लढवत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दीपक मानकर यांचा एक पुत्र भाजपमधून निवडणूक लढवत आहेत तर दुसरा पुत्र हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. दीपक मानकर यांचे पुत्र हर्षवर्धन मानकर हे प्रभाग क्रमांक 11 मधून अजित पवारांच्या राष्ट्रवादी मधून निवडणूक लढवत आहेत. तर दीपक मानकर यांचे दुसरे पुत्र राघवेंद्र मानकर हे प्रभाग क्रमांक 25 मधून भाजपमधून निवडणूक लढवत आहेत.
गेल्या 9 वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या संघटनेत पदाधिकारी आणि प्रभागात, पूर्णवेळ ‘कार्यकर्ता’ म्हणून केलेल्या कामाचा पक्षाने विचार केला आणि मला संधी पक्षाने दिल्याची प्रतिक्रिया राघवेंद्र मानकर यांनी दिली आहे. राघवेंद्र हे भाजपचे शहर सरचिटणीस आहेत, तर हर्षवर्धन मानकर हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आहेत.
दीपक मानकर हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष राहिलेले आहेत. दरम्यान राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष पुणे महापालिका निवडणुकीमध्ये एकमेकांच्या समोर उभे आहेत. अशातच मानकरांच्या दोन्ही मुलांना भाजप आणि राष्ट्रवादीमधून उमेदवारी मिळाल्याने पुणे शहरात याची विशेष चर्चा रंगली आहे.
