भाजप आमदार देवयानी फरांदे आज भूमिका मांडताना भावूक झाल्या. नाशिकमध्ये आज ठाकरे गट आणि मनसेच्या नेत्यांनी आज भाजपात प्रवेश केला. पण त्या नेत्यांच्या पक्षप्रवेशाला देवयानी फरांदे यांचा विरोध होता. या पक्षप्रवेशानंतर भूमिका मांडताना देवयानी फरांदे या भावूक झाल्या.
नाशिकमधील आजच्या भाजपच्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमानंतर भाजपच्या आमदार देवयानी फरांदे या माध्यमांसमोर आल्या. त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी भूमिका मांडत असताना देवयानी फरांदे या भावूक झाल्या. “आजचे पक्षप्रवेश झाले नसते तरी भाजपच जिंकलं असतं. ज्यांना मला कोंडीत पकडायचं आहे त्यांनी पकडावं, मी कुणाला घाबरत नाही. मी मंत्री गिरीश महाजनांवर नारा नाही. त्यांना चुकीच्या पद्धतीने ब्रीफ केलं. पक्षप्रवेश झाल्यावर पक्ष मोठा होतो पण निष्ठावंतांवर अन्याय नको. पक्ष मोठा होताना निष्ठावंतांवर अन्याय होऊ नये. वरिष्ठांनी या सर्व विषयांची दखल घ्यावी”, असं देवयानी फरांदे म्हणाल्या आहेत. देवयानी फरांदे यांना यावेळी भूमिका मांडताना गहिवरुन आलेलं बघायला मिळालं.
“मी विरोध करण्यापेक्षा, मी त्या मतदारसंघाची आमदार असल्याने माझं मत असं होतं की, त्या ठिकाणी एक अतिशय सक्षम उमेदवार बबलू शेलार यांचा प्रवेश झालेला होता. आमचे उर्वरित सर्व उमेदवारांना घेऊन पक्षाचे तीन असे पॅनल तयार केलं गेलं असतं तर शंभर टक्के निवडले जाणार होते, असं लोकप्रतिनिधी या नात्याने मत होतं. अन्यथा माझं कुणाच्याही पक्षप्रवेशाला विरोध करण्याचं कारण नाही. कार्यकर्त्याच्या पाठिशी ठामपणे उभे राहयाल हवं. ते वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करतात. त्यामुळे बाहेरुन आलेल्यांसोबत तीन पक्षातील उमेदवार दिले तर त्यांचा विजय होईल, असं मला वाटत होतं”, असं देवयानी फरांदे म्हणाल्या.
देवयानी फरांदे यांच्या डोळ्यांत अश्रू
“तुम्ही सर्वजण मला ओळखतात. गेल्या 40 वर्षांमध्ये मी स्वत: माझ्यावर कधी अन्याय झाला असेल, पक्षाकडून कुठली भूमिका घेतली गेली असेल स्वत:साठी आजपर्यंत कधी जाहीर भूमिका घेतलेली नाही. पक्षाची मी निष्ठावान कार्यकर्ता आहे. तशी भूमिका मी कधीही घेणार नाही. पण सर्वांनी नेते व्हायचं आणि सगळ्यांनी आपापलं बघायचं. मग पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना कुणी पाठबळ द्यायचं? त्यामुळे मी सकाळी सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती. एवढाच विषय होता”, असं देवयानी फरांदे यांनी स्पष्ट केलं.
“गहिवरुन येण्याचं कारण महत्त्वाचं म्हणजे मी अतिशय सामान्य कार्यकर्ती आहे. माझ्या डोळ्यांसमोर कार्यकर्त्यांचा बळी दिला जात असेल तर हे काही मला बरोबर वाटलं नाही. जे आज पक्षात आलेले आहेत. पक्षाची वरिष्ठ पदाधिकारी म्हणून मी त्यांचं स्वागत करते. पण आज जे घडलं ते मला आवडलेलं नाही”, असं म्हणत असताना देवयानी फरांदे यांना गहिवरुन आलं.
