स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच कोपरगावात ऐतिहासिक घडामोडी घडल्या आहेत. अहिल्यानगरच्या कोपरगावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला आहे. त्यामुळे या निकालाची अहिल्यानगर जिल्ह्यात चांगलीच चर्चा आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव काळे आणि कोल्हे या दोन मातब्बर नेत्यांचा गड मानला जातो. मागील विधानसभेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आशुतोष काळे महायुतीकडून उमेदवार असल्याने कोल्हेंनी थांबण्याचा निर्णय घेतला आणि महायुतीला पाठिंबा दिला. नगरपरिषद निवडणुकीत काय चित्र असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना आशुतोष काळे यांनी मोठी राजकीय खेळी खेळत राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष आणि पालकमंत्री विखे पाटलांचे निकटवर्ती असलेले ओमप्रकाश उर्फ काका कोयटे यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी दिली. त्यामुळे कोपरगावात नगराध्यक्ष पदाची लढत अत्यंत काँटे की टक्कर झाली.
अटीतटीच्या लढतीत भाजपचे पराग संधान यांनी कोयटे यांचा 409 मतांनी पराभव केला. तसेच पालिकेत बहुमत मिळवलं.त्यामुळे भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. विवेक कोल्हे यांनी आखलेल्या रणनीतीची मात्र जोरदार चर्चा होत आहे. एकीकडे आमदार काळेंची साथ असलेले आणि 50 वर्षांचा राजकीय सामाजिक कार्याचा अनुभव असलेले काका कोयटे यांच्यासमोर लढत देणं सोपं नव्हतं. मात्र कोल्हेंनी चाणक्यनीतीने स्वपक्षातील बंडखोरी थांबविण्यात यश मिळवलं आणि भाजपपासून दूर असलेला मुस्लिम मतदार जोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या धोरणा प्रमाणे सर्वांना सोबत घेऊन चालण्याचे आश्वासन दिले.
Pune Politics : प्रशांत जगताप यांचा राजकीय बॉम्ब, शरद पवारांच्या पक्षाला रामराम, पण निवडणूक लढणार असल्याची घोषणा
कोल्हे कारखान्याच्या सीएनजी प्लांटच्या उद्घाटनाप्रसंगी देशाचे सहकारमंत्री अमित शाह यांनी विवेक कोल्हेंचं कौतुक केलं होतं. त्यामुळे कोल्हेंसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. अखेर दिवस रात्र एक करत कोल्हेंनी या निवडणुकीत घवघवीत यश मिळवत पालिकेवर पहिल्यांदा भाजपचा नगराध्यक्ष बसवण्यासाठी मोलाचे प्रयत्न केले.
पराभवानंतर काय म्हणाले कोयटे?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी करत असलेले ओमप्रकाश उर्फ काका कोयटे पराभवानंतर म्हणाले, गुंडगिरी आणि धनशक्तीच्या जोरावर विरोधकांनी माझा पराभव केला. कोल्हेंच्या चाळीस वर्षांच्या सत्तेपुढे मी फक्त 40 दिवसात तयारी केली. तरी माझ्या विरोधात संपूर्ण कोल्हे कुटुंबाला मैदानात उतरावे लागले. त्यामुळे त्यांचा विजय दहशत आणि गुंडगिरीचा असल्याचे काका कोयटे यांनी म्हटले आहे.
1500 रुपयांचा खर्च अन् मतदारांचा ‘रॉबिनहूड’; छत्रपती संभाजीनगरच्या पहिल्या निवडणुकीचा ‘थ्रिलर’ निकाल
आमदार काळे काय म्हणाले?
“नगरपरिषदेची निवडणूक पुढे ढकलल्याने मधल्या काळात काका कोयटे यांच्या संस्थेची आणि त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. आम्हाला फक्त ०.९४ टक्के मतं कमी पडले. त्यासाठी विरोधकांना किती परिश्रम घ्यावे लागले. त्यांच्यासोबत मित्रपक्ष होते परंतु घड्याळ आणि कमळाची आकडेवारी बघितली तर घड्याळाला जास्त मते मिळाली आहे. त्यामुळे कोणीही हवेत जायचे कारण नाही”, असे म्हणत आमदार आशुतोष काळे यांनी कोल्हेंवर नाव न घेता निशाणा साधला.
