प्रेमामध्ये समर्पण असतं. प्रेम ही भावना फार वेगळी आहे. पण काही जणांना ते समजत नाही. ते रागाच्या भरात नको ते कृत्य करतात आणि प्रेमालाही बदनाम करतात. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीसोबत लग्न केलं म्हणून एका तरुणाने प्रेयसीच्या पतीचा निर्घृण खून केला आहे. या घटनेमुळे पुरंदर तालुका हादरला आहे.
जेजुरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत दीपक जगताप यांचा अवघ्या एक महिन्यापूर्वी वाघापूर (ता. पुरंदर) येथील पायल अमोल कांबळे हिच्याशी प्रेम विवाह झाला होता. दीपक हा उरुळी कांचन येथील एका खासगी गॅरेजमध्ये नोकरीला होता. विवाहानंतर काही दिवसांतच तो पत्नीसह उरुळी कांचन येथे राहण्यास गेला होता. दरम्यान, पायलचा पहिला प्रियकर असलेल्या सुशांत मापारी याला या विवाहाचा प्रचंड राग होता. गेल्या महिनाभरापासून तो दीपक आणि पायल यांना सतत फोन आणि व्हॉट्सअॅप कॉल करून धमक्या देत होता. मीच पायलशी लग्न करणार होतो, तुम्ही दोघांनी लग्न का केलं? असे म्हणत तो दीपकला जीवे मारण्याची धमकी देत असल्याची माहिती दीपकने आपल्या कुटुंबीयांनाही दिली होती.
दीपक आपल्या पत्नीला घेऊन शनिवारी १३ डिसेंबर रोज राजेवाडी येथे आला होता. पत्नीला माहेरी सोडून परत जात असताना सुशांत मापारी याने दीपकला वारंवार फोन केले. पायलचा मोबाईल माझ्याकडे आहे, तो घ्यायला ये. बसून सगळा वाद मिटवू, असे सांगत त्याला भेटीस बोलावले. या बहाण्याने दीपक माळशिरस हद्दीतील रामकाठी शिवारात गेला. याच ठिकाणी आरोपी सुशांत मापारी याने अचानक कोयता काढून दीपकच्या डोक्यावर, मानेवर आणि पायांवर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या दीपकचा जागीच मृत्यू झाला. खून केल्यानंतर आरोपीने कोयता घटनास्थळीच टाकून पलायन केले.
दीपक रात्री उशिरापर्यंत घरी न पोहोचल्याने आणि त्याचा मोबाईल बंद आल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. अखेर माळशिरस गावच्या रामकाठी शिवारात रक्ताच्या थारोळ्यात दीपकचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी दीपक आणि आरोपी यांच्या दुचाकीही आढळून आल्या.
या प्रकरणी दिपकचा मामा संतोष शेंडकर (रा. चांबळी, ता. पुरंदर) यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. घटनेची माहिती मिळताच सासवड उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौड तसेच बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि तपासाबाबत पोलिसांना सूचना दिल्या.
