घराचा खुला दरवाजा हे चोरट्यांसाठी ‘वेलकमिंग’ ठरत असून, उपनगरांमध्ये उघड्या दरवाजातून मौल्यवान चीजवस्तू लंपास होण्याच्या घटना वाढत आहे. एरंडवणे, धनकवडी आणि वारजे भागातील बहुमजली इमारतींमध्ये शिरून चोरटे सदनिकांच्या खुल्या दरवाजातून आतमध्ये शिरून दागिने-इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर सफाईदारपणे डल्ला मारत आहेत.
वारजे येथील पहिल्या मजल्यावर राहणारा तरुण झोपला असताना, घराचा दरवाजा उघडा राहिल्याची संधी चोरट्यांनी साधली. या तरुणाच्या ऑफिसच्या बॅगेतून लॅपटॉप, हेडफोन आणि दहा हजार रुपयांची रोकड लांबवून चोरट्यांनी पोबारा केला. या प्रकाराने हवालदिल झालेल्या तरुणाने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. दरवाजे उघडे ठेवण्याची चूक नागरिकांना महागात पडत असून, सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पुणेकरांनी सतर्क राहण्याचे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.
रखवालदाराच्या घरातून तीन लाखांचे दागिने लंपास
सोसायटीतील रखवालदाराच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना मंगळवार पेठेत घडली. याबाबत, २७ वर्षीय रखवालदाराने समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार मंगळवार पेठेत लडकत पेट्रोल पंपाजवळ एका सोसायटीत रखवालदार म्हणून काम करतो. सोसायटीतील तळमजल्यावर त्याचे घर आहे.
तक्रारदार कुटुंबीयांसमवेत एक डिसेंबरला बाहेरगावी गेला होता. ती संधी साधून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटातून दोन लाख ९९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले. घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदारांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण ताब्यात घेतले आहे.
स्पोर्ट्स क्लबमधून मोबाईल चोरीला
वानवडी भागातील स्पोर्ट्स क्लबमधून एका १९ वर्षीय खेळाडूचा ५० हजार रुपयांचा मोबाईल अज्ञाताने चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांत चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुण शनिवारी दुपारी या क्लबमध्ये खेळायला गेला होता. त्या वेळी मोबाइल चोरीचा प्रकार घडला.
अशी घ्या काळजी
- मुख्य दरवाजा कधीही उघडा ठेवू नका, त्याला कडी-कुलूप लावण्याची सवय लावा.
- जाळीचा दरवाजा बसवून घ्या.
- अनोळखी व्यक्तींपासून सावध रहा
- सोसायटीचे प्रवेशद्वार, मजल्यांवर सुरक्षेसाठी सीसीटीव्हीचा वापर करा
- सोने-चांदीचे दागिने व रोकड कपाटात न ठेवता बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा
- शेजाऱ्यांशी संवाद ठेवा, जेणेकरून संशयास्पद हालचाल दिसल्यास ते तुम्हाला कळवू शकतील.
