Jalgaon Accident News : जळगाव जिल्ह्यामध्ये एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. विजेच्या धक्क्याने वडील आणि मुलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.
एकाच कुटुंबातील बाप-लेकीचा अंत
जळगाव शहरातील मास्टर कॉलनी परिसरात आज शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास एक अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. या घटनेत इलेक्ट्रिक शॉक लागून एकाच कुटुंबातील बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर, त्यांच्यासोबत असलेली नऊ वर्षांची भाची गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
धक्कादायक! देवस्थानाच्या नावानं बनावट अॅप्स; देणग्या थेट वैयक्तिक खात्यात, शनिशिंगणापूरमध्ये मोठा घोटाळा उघड
भाचीला वाचवायला गेले अन्…
मास्टर कॉलनी येथील रहिवासी मौलाना साबीर खान नवाझ खान (वय 38) हे कुटुंबासह वास्तव्याला होते. आज शुक्रवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास त्यांची भाची मारिया फतेमाबी (वय 9 वर्ष) ही गच्चीवर कपडे सुकवण्यासाठी गेली होती. त्याचवेळी कपडे टाकत असताना, घराजवळून गेलेल्या उच्च दाबाच्या (हाय व्होल्टेज) इलेक्ट्रिक तारेचा तिला जोरदार धक्का बसला. भाचीला शॉक लागल्याचं पाहून, साबीर खान यांची मोठी मुलगी आलिया (वय 12) तिला वाचवण्यासाठी धावली. पण तिलाही विजेचा जोरदार धक्का बसला. मुलगी आणि भाची दोघींना शॉक लागल्याचे पाहून मौलाना साबीर खान हे त्यांना वाचवण्यासाठी गेले, तेव्हा त्यांनाही विजेचा जबरदस्त धक्का बसला.
या दुर्घटनेत मौलाना साबीर खान आणि मुलगी आलिया यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. भाची मारिया फतेमाबी गंभीर जखमी झाली असून, तिला तातडीने नजीकच्या सारा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सुदैवाने, साबीर खान यांचा लहान मुलगा मात्र थोडक्यात बचावला.
Pune News : अंधारात फोनवर बोलताना पायांना काहीतरी लागल्याचं जाणवलं, समोर बघतो तर…; पुण्यात तरुणावर बिबट्याचा हल्ला
नागरिकांचा महावितरणावर आरोप
या घटनेनंतर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. परिसरातील नागरिकांनी आणि नातेवाईकांनी महावितरण कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून घराजवळून गेलेली उच्च दाबाची विद्युत वाहिनी हटवण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, महावितरणने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडली, असे संतप्त नागरिकांनी सांगितलं.
