Pune News: मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांची चौकशी झाली असून, ते परदेशात लग्नाला जाणार आहेत. दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांच्या चौकशीतून पार्थ पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वी दिग्विजय पाटील यांना चौकशीची नोटीस पाठवली होती. त्यानुसार ते 2 डिसेंबर रोजी पुणे पोलीस आयुक्तालयात हजर राहिले. त्यावेळी ईओडब्ल्यू अधिकाऱ्यांनी त्यांची अनेक मुद्द्यांवर सविस्तर चौकशी केली. चौकशीदरम्यान पाटील यांनी, ‘गरज भासल्यास मी पुन्हा उपस्थित राहील. मला परदेशात जय पवार यांच्या लग्नाला जायचं असल्यानं, लग्नावरून परत आल्यानंतर मी पुन्हा चौकशीसाठी येईन,” असंही आश्वासन दिलं. मात्र त्यांनी परदेशात लग्नसमारंभासाठी जाणार असल्याचंही या चौकशी दरम्यान सांगितल्याची माहिती आहे.
दुसरीकडे, बहरीनमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र जय पवार यांच्या लग्न सोहळ्याची तयारी सुरू आहे. या सोहळ्यास दिग्विजय पाटील हजेरी लावण्याची शक्यता व्यक्त केली जाते. परंतु त्यांच्यावरच खडक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदलेला असल्याने चौकशीची प्रक्रिया अधिक गती घेऊ शकते.
दरम्यान, याच प्रकरणात आधीच शीतल तेजवानी हिला अटक झाली असून तिच्या चौकशीदरम्यान उघड झालेल्या माहितीमुळे पार्थ पवार यांच्या अडचणीही वाढू शकतात, अशी चर्चा आहे. अमेडिया नावाच्या कंपनीमध्ये 99 टक्के भागभांडवल पार्थ पवार यांच्या नावावर असल्याची माहिती आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात या तपासाला वेग येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मुंढवा जमीन प्रकरणामुळे पवार परिवारातील राजकीय वातावरण आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.
