• Sun. Jun 7th, 2026

    Pune Crime: पुण्यातील विवाहबाह्य लव्ह स्टोरीचा भयंकर अंत; प्रेयसी राणीला फिरायला नेलं, गाडी रस्त्यात थांबवली अन्…

    Pune Crime: पुण्यातील विवाहबाह्य लव्ह स्टोरीचा भयंकर अंत; प्रेयसी राणीला फिरायला नेलं, गाडी रस्त्यात थांबवली अन्…

    Pune Murder Case: पुण्यात एका विवाहित प्रेयसीचा खून करून मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिलेच्या सततच्या लग्नाच्या हट्टामुळे कंटाळून आरोपी अनिकेतने हा प्लॅन आखला होता.

    पुण्यातील विवाहित प्रेयसीला धाराशिवला नेऊन संपवलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे: धाराशिव इथं एका विवाहित प्रेयसीची हत्या करून मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनिकेत महादेव कांबळे (वय 33) याने राणी गायकवाड (वय 26) हिचा गळा दाबून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी पेट्रोल टाकून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. राणी सतत अनिकेतसोबत राहण्याचा आणि लग्न करण्याचा आग्रह धरत असल्याने कंटाळून त्याने हा प्लॅन आखला असल्याचे समजते. वाकड पोलिसांनी अनिकेतला अटक केली असून त्याच्यावर खुनाचा व पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, 26 नोव्हेंबर रोजी राणी घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी वाकड पोलिसांत दिली होती. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण केले असता, राणी सतत अनिकेतच्या संपर्कात असल्याचं आढळून आलं. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अनिकेतला चौकशीसाठी बोलावलं. सुरुवातीला त्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र तांत्रिक पुरावे समोर येताच त्याने खुनाची कबुली दिली.

    नेमकं काय घडलं?

    राणी आणि अनिकेत दोघेही विवाहित होते आणि त्यांना मुलेही होती. राणीच्या घरच्यांना त्यांच्या प्रेमसंबंधांची माहिती मिळाल्यानंतर ती नवऱ्यापासून दूर जाऊन अनिकेतसोबत राहण्याचा आणि लग्न करण्याचा हट्ट धरत होती. परंतु अनिकेत स्वतः विवाहित असल्याने तो यासाठी तयार नव्हता. तिच्या सततच्या तगाद्यामुळे अनिकेत त्रस्त झाला होता.

    दरम्यान, 26 नोव्हेंबर रोजी अनिकेतने राणीला फिरण्यासाठी बोलावले. दोघेही कारमधून फिरत असताना त्यांच्यात सोबत राहण्यावरून व लग्नावरून पुन्हा वाद झाला. आधीच खुनाचा निर्णय घेतलेल्या अनिकेतने राणीला “गावी घेऊन जातो” असं सांगून कार धाराशीव जिल्ह्याच्या दिशेने वळवली. 27 नोव्हेंबर रोजी पहाटे ढोकी गावाजवळ कार थांबवून, झोपेत असलेल्या राणीचा गळा दाबून त्याने तिचा खून केला. त्यानंतर लोखंडी रॉडनेही तिच्यावर वार केले. घाबरलेल्या अवस्थेत त्याने मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी पेट्रोल टाकून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला.

    तपासात सर्व पुरावे अनिकेतविरुद्ध मिळाल्यानंतर वाकड पोलिसांनी त्याला अटक केली असून राणीच्या हत्येप्रकरणी खून आणि पुरावा नष्ट करण्याच्या कलमांनुसार त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा